भरधाव आयशर टेम्पोची इंडिकाला धडक : युवक ठार तर दुसरा गंभीर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि 7 जानेवारी - विडणी तालुका फलटण येथे फलटण पंढरपूर रस्त्यावर विडणी गावच्या हद्दीत भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या इंडिका कारला रॉंग साईड ला जाऊन जोरदार धडक दिल्याने इंडिका कारमधील 22 वर्षीय युवक मृत पावला असून दुसरा 21 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, ता.६/१/२०२१ रोजी, आयशर टेम्पो क्र.एमएच ०३/सीव्ही/१६९४ हा पंढरपूर बाजूकडून फलटण कडे चालला होता तर इंडिका कार क्रमांक एम एच १४/ डीएन/७९८५ हे फलटण बाजूकडून पंढरपूर दिशेला चालली होती. सकाळी १०.४५ वा चे सुमारास मौजे विडणी ता.फलटण गावचे हददीत पवारवाडीजवळील बाळासाो गाडे यांचे बंगल्यासमोर, फलटण ते पंढरपुर जाणारे रोडवर, चालक मारती विठ्ठल कोडग वय ४० वर्षे रा.आवंडी ता जत जि.सांगली याने आपले ताब्यातील आयशर टेम्पो हा पंढरपुर बाजुकडुन फलटण बाजुकडे चालवत घेऊन जात असताना, हयगयीने अविचाराने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन, भरधाव वेगाने चालवुन, राँगसाईडला जावुन, समोरुन फलटण बाजुकडुन येणारे इंडिका कार हिस समोरुन ठोकर दिली. झालेल्या अपघातामध्ये इंडिका कार चालक सुहास मारुती गरगडे वय २२ रा गुणवरे ता.फलटण यास गंभीर दुखापत होवुन त्याचा मृत्यु झाला तसेच कारमधील सौरभ हणमंत गरगडे वय २१ वर्षे यास गंभीर दुखापत झाली असल्याची फिर्याद विशाल तुळशीदास गरगड वय ३४ वर्षे रा गुणवरे ता.फलटण यांनी दिली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार डी डी कदम हे करीत आहेत.




No comments