Breaking News

फलटणमध्ये ढोल-ताशांच्या खोलीतून १२ पितळी ताशांची चोरी; ९६ हजारांचे साहित्य लंपास

12 brass drums stolen from drum and drum room in Phaltan; Materials worth Rs. 96,000 looted

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २९ ऑगस्ट : फलटण शहरातील नाना पाटील चौक परिसरातील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या आवारात ठेवलेल्या ढोल-ताशांच्या साहित्यामधून १२ पितळी ताशे चोरीला गेल्याची घटना शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. चोरी झालेल्या साहित्याची किंमत सुमारे ९६ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

    याबाबत शुभम संतोष ओतारी (रा. कसबापेठ, फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या एका खोलीमध्ये ढोल पथकाचे साहित्य ठेवण्यात आले असून, तेथील विद्यार्थ्यांना ढोल-ताशा वादनाचे प्रशिक्षण दिले जाते.

    दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ७.३५ वाजता ढोल-ताशांच्या सरावासाठी विद्यार्थी शाळेच्या मैदानावर जमले होते. काही विद्यार्थी येणे बाकी असल्याने साहित्य ठेवलेल्या खोलीला त्यावेळी कुलूप लावलेले नव्हते.

    दरम्यान, अनिकेत करपे हा उशिरा आल्याने खोलीतून साहित्य घेण्यासाठी जात असताना गेटजवळ काहीतरी वाजल्याचा आवाज त्याला आला. त्याने पाहणी केली असता एक इसम खोलीतील पितळी ताशे घेऊन जाताना दिसल्याचे तक्रारीत नमूद आहे.

    अनिकेतने तत्काळ इतरांना फोन करून बोलावले. त्यानंतर शुभम ओतारी, कौस्तुभ पोपट भोईटे आणि प्रतिक विजय पवार यांनी संबंधित इसमाचा पाठलाग केला. तो शिवाजीनगर परिसरात आढळून आला. त्याचे नाव रोहित मनोज शिंदे (वय १८, रा. शिवाजीनगर, फलटण) असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

    खोलीची पाहणी केली असता पितळी धातूचे गोल आकाराचे १२ ताशे गायब असल्याचे निदर्शनास आले. या साहित्याची अंदाजे किंमत ९६ हजार रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

    संबंधित तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, चोरीच्या या घटनेप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

No comments