Breaking News

पुढील ५ वर्षांत पेपरलेस बँक ; बँकेचा व्यवसाय २० हजार कोटींवर - श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर

Paperless bank in the next 5 years; Bank's business to reach Rs 20 thousand crores - Shrimant Ramraje Naik-Nimbalkar

    सातारा जिल्हा बँकेची ७६ वी वार्षिक सभा उत्साहात; सर्व विषय एकमताने मंजूर

  सातारा (गंधवार्ता वृतसेवा) दि. २९ ऑगस्ट : जिल्ह्यातील सहकारी संस्थांची मातृसंस्था म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ७६ वी वार्षिक साधारण सभा खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सभेत विविध विषयांवर सांगोपांग चर्चा होऊन सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.

    बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर सहकार चळवळीशी व बँकेशी संबंधित दिवंगत मान्यवर, कार्यकर्ते, बँक सेवक-माजी सेवक, देशासाठी बलिदान दिलेले जवान तसेच दिवंगत खातेदार व हितचिंतकांना सभेने दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली.

    बँकेचे अध्यक्ष मा. खा. नितीन पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. बँक स्थापनेपासून नफ्यात असून आजपर्यंत सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. तसेच बँकेचा निव्वळ एनपीए सलग १९ वर्षे शून्य टक्के राहिला असून वसुलीची टक्केवारी कायम ९५ टक्क्यांहून अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.

    नाबार्ड, केंद्र व राज्य शासन तसेच सहकारी बँकिंग क्षेत्रातील नामांकित संस्थांकडून बँकेला आतापर्यंत १२३ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या यशाचे श्रेय बँकेचे सभासद व ग्राहकांना असल्याचे अध्यक्षांनी नमूद केले. शेतकरी, सर्वसामान्य सभासद यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज व ठेव योजना, सामाजिक बांधिलकीच्या योजना तसेच कृषी व ग्रामीण विकासाच्या उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.

    माजी विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी बँकेच्या वाटचालीचा आढावा घेताना सांगितले की, १५ ऑगस्ट १९४९ रोजी यशवंतराव चव्हाण, आर. डी. पाटील व आबासाहेब वीर या प्रमुख नेत्यांनी बँकेची स्थापना केली. बँकेला स्थापनेपासून चांगले नेतृत्व लाभले असून विलासराव पाटील-उंडाळकर यांनी बँकेला आर्थिक शिस्त लावली आणि पुढील नेतृत्वाने ती कायम राखल्यामुळे बँकेने मोठी प्रगती केली.

    सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशपातळीवरील एक नवीन ब्रँड बनला असून ती सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे. बँकेचा एकूण व्यवसाय २० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे, असे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.

    बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून फिनॅकल कोअर बँकिंग प्रणालीच्या माध्यमातून ग्राहकांना आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मागील पाच वर्षांत डिजिटल व्यवहारांत मोठी प्रगती झाली असून ग्राहकांनी डिजिटल बँकिंग व रुपे कार्डचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

    “आधुनिक बँकेने शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून पुढील पाच वर्षांत पेपरलेस बँक होण्याच्या दिशेने वाटचाल करावी,” अशी अपेक्षाही रामराजे यांनी व्यक्त केली. सातारा जिल्ह्यात भविष्यात औद्योगिकीकरण वाढणार असल्याने मोठ्या उद्योगांनाही कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विकास सेवा संस्था ही त्रिस्तरीय पतसंरचना कायम राहिली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    सभेत विकास संस्थांच्या सभासदांनी विविध कर्ज योजना व कामकाजासंदर्भातील अडचणी तसेच सूचना मांडल्या. या सूचनांचा विचार करून सभासदांच्या अडचणी सोडविण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सभासदांच्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन केले.

    यावेळी जिल्ह्यात उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या विकास सेवा संस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच सन २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकेच्या शाखांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

    सभेस बँकेचे संचालक व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्यासह बँकेचे संचालक, अधिकारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी-प्रतिनिधी, सभासद व पत्रकार उपस्थित होते.
उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी उपस्थित मान्यवर व सभासद प्रतिनिधींचे आभार मानले.

No comments