Breaking News

अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा

The central team took stock of the damage caused by heavy rains and floods

        पुणे -: पुणे विभागात माहे जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबतचा केंद्रीय पथकाने आज विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला.

        यावेळी आतंर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाचे प्रमुख रमेश कुमार, ग्राम विकास विभागाचे उप सचिव यशपाल, केंद्रीय वित्त विभागाचे सल्लागार आर.बी. कौल, कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग, रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तुषार व्यास, अधीक्षक अभियंता एम.एस. सहारे, उपसचिव सुभाष उमराणीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ.अनिल रामोड, पुणे, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनुक्रमे डॉ.राजेश देशमुख, शेखर सिंह, मिलींद शंभरकर, दौलत देसाई, सोलापूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

        केंद्रीय पथक प्रमुख रमेश कुमार म्हणाले, औरंगाबाद व पुणे विभागात अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागास प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली आहे. या विभागात सोयाबीन, उडीद, तूर, कापूस, बाजरी, या पिकांचे आणि पालेभाज्या, फळे यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. याचबरोबर रस्ते, वीज, घरे, यांसारख्या पायाभूत सुविधांवर परिणाम झालेला निदर्शनास आला आहे. झालेल्या नुकसानापोटी केंद्राकडून अधिकाधिक मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल, असेही ते म्हणाले.

        केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच त्या योजनांचा वापर नागरिकांनी कशाप्रकारे केला पाहिजे याबाबत ग्रामसभा आयोजित करुन माहिती द्यावी, अशा सूचनाही केंद्रीय पथक प्रमुख श्री. कुमार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आपत्ती ही आपत्ती असते. आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करणे. आंतर जिल्हा समन्वय ठेवून नुकसानाची अहवाल तयार करणे याबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात यावी, असेही त्यांनी सूचविले.

        केंद्रीय पथकास पुणे विभागात माहे जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

No comments