कामगार करणार उपोषण स्थळावर दिवाळीची पहिली आंघोळ - ॲड. निकम
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 13 नोव्हेंबर - श्रीराम सह.साखर कारखाना लि.फलटण व नीरा व्हेली अर्कशाळा या दोन्ही संस्थेतून निवृत्त कर्मचारी ग्रॅच्युइटीची रक्कम व थकीत पगार आणि रजेचा कामगारांना पगार मिळावा याकरता ऐन दिवाळीत फलटण कृती समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली १५० कामगारांना घेऊन साखळी उपोषण चालू असून, आज पाचवा दिवस उलटून गेला तरी कारखाना प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही याच्या निषेधार्थ शनिवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२० रोजी सर्व कामगारांना घेऊन दिवाळीच्या पहिल्या दिवशी उपोषणस्थळी अभ्यंगस्नान (पहिली अंघोळ) करणार असल्याचे ॲड. निकम यांनी जाहीर केले आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.फलटण व नीरा व्हॅली अर्कशाळा या दोन्ही संस्थेतून सन २०१७ ते २०२० या सालात एकूण ६० कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. या कामगारांची कारखान्याकडे व अर्कशाळेकडे सर्वाची मिळून अडीच ते तीन कोटी रुपये ग्रॅच्युइटीची रक्कम थकीत आहे. त्याचप्रमाणे थकीत पगार व रजेचा पगार अशी येणे रक्कम आहे. वास्तविक पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ॲक्ट या कायद्यातील तरतुदीनुसार कामगार सेवानिवृत्त झाल्यानंतर पंधरा दिवसाचे आत संबंधीत संस्थेने ग्रॅच्युइटीची रक्कम कामगारांना देणे बंधनकारक आहे. परंतु गेली तीन वर्ष कामगारांनी अनेकवेळा हेलपाटे मारुन सुध्दा कारखान्याने त्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम अद्याप दिली नाही. कामगार सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. थकीत रकमेसाठी कामगारांनी अनेकवेळा कारखान्याकडे व नेतृत्वाकडे हेलपाटे घातले. त्याचप्रमाणे कामगार आयुक्त यांचेकडेही तक्रार केली, पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. त्यामुळे हक्काचे पैसे मिळण्यासाठी कामगारांनी तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलनास सुरुवात केली असल्याचे ॲड. नरसिंह निकम यांनी कळवले आहे.
No comments