रोहित दादा, तुम्ही खांद्यावरुन खाली उतरा म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल -आमदार गोपीचंद पडळकर

गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 10 ऑक्टोबर 2020) - आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आ. रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. कर्जत - जामखेड मतदारसंघातील रस्त्याची झालेली दुरावस्था व रोज नेतेमंडळींना आ. रोहित पवार यांच्याकडून दिला जाणारा सल्ला याबाबत ही टीका आहे.
आ. गोपीचंद पडळकर यांनी आपल्या व्हिडिओ मध्ये म्हटले आहे की, ५० वर्षांपासून नेतृत्व करणारे शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. मी औरंगाबादला दौऱ्यानिमित्त चाललो असताना या मतदारसंघात प्रवेश केल्यापासून या रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत.
रोहित पवार रोज टीव्हीवर, ट्वीटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सल्ले देतात. त्यांना त्यांची उंची फार वाढल्यासारखी वाटते. पण त्यांना माहिती नाही, ते शरद पवारांच्या खांद्यावर बसून त्यांची उंची मोजतात.
रोहित दादा, तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल. हा मिरज गावातील रस्ता आहे. तुम्हाला साधा गावातला रस्ता करता येत नसेल आणि तुम्ही देशाच्या नेतृत्वांना जर सल्ले देत असाल तर ते सल्ले देण्यापेक्षा कर्जत मतदारसंघातील रस्त्यावर प्रचंड रहदारी आहे.
या रहदारीत तुम्हाला लोकांचे प्रश्न जाणून घेणं गरजेचं आहे. राज्यात तुमचं सरकार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कर्जत विधानसभा मतदारसंघातील रस्ते दुरुस्त करावेत आणि चांगले करावेत आणि त्यानंतर बाकीच्या लोकांना सल्ले द्यावेत, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
No comments