मुसळधार पावसाने फलटण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत
Heavy rains disrupt life in Phaltan taluka
फलटण -: परतीचा मान्सून सुरु असतानाच सागरी वातावरणातील बदलाद्वारे गेल्या 2/4 दिवसात दिवसभर पावसाळी वातावरण, ढगाळ हवामान, वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पावसाने फलटण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे.
खरीपाच्या आगाप बाजर्या, मका अन्य पिके समाधानकारक निघाली असली तरी मागास बाजार्यांना पावसाचा तडाखा बसल्याने काही क्षेत्रातील बाजरी, मका पीक अंशतः वाया गेले तर काही पूर्ण वाया गेले. त्या पार्श्वभूमीवर बळीराजा रब्बीच्या तयारीला लागला असताना सागरी वातावरणातील बदलामुळे शेती व शेतकर्यांसह संपूर्ण जनजीवन संकटात सापडले आहे.
संततधार पावसाने नद्या, नाले, ओढ्यांना प्रचंड पूर आल्याने त्या काठच्या जमिनींची मोठी धूप झाली आहे, तर संततधार पावसाने शेतात साठलेल्या प्रचंड पाण्यामुळे अनेकांच्या शेत जमिनींची बांध बंदिस्ती तुटल्याने जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप झाली आहे.
![]() |
| नुकसानीची पाहणी करताना आ. दीपक चव्हाण समवेत नगरसेविका सौ. प्रगति कापसे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर |
शेतातील उभ्या ज्वारी, बाजरी, मका, कडधान्ये किंवा अन्य पिकांचे, अथवा भाजीपाला, कांदा, फळबागा यांचे नुकसान सतत होत असते, कधी कीड रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने, कधी अतिवृष्टीने तर कधी पाण्याअभावी पिके हातची जाण्याचे अनेक प्रसंग शेतकर्याने पचवले असून पुन्हा नव्या उमेदीने पुढच्या पिकाची तयारी करण्याची त्याला सवय झाली आहे असे म्हंटले तर ते वावगे होणार नाही, पण अतिवृष्टीमुळे जमिनीची होणारी धूप कोणत्याही शेतकर्याला न सोसणारी असते, पिढ्यान पिढ्या खत माती घालून मोठ्या मेहनतीने तयार केलेल्या जमिनीची धूप म्हणजे शेतकर्यांचे सर्वस्व लुटून नेल्यासारखे आहे. या अतिवृष्टीने अनेक शेतकर्यांचे हे सर्वस्वच लुटून नेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करताना केवळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे न करता ज्यांच्या जमिनी वाहुन गेल्या आहेत त्याचे स्वतंत्र पंचनामे करण्याच्या सूचना संबंधीत यंत्रणांना देऊन या शेतकर्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी मागणी होत आहे.
दरम्यान साखर कारखान्यांचे गळीत हंगाम प्रतिवर्षी दसर्याच्या सुमारास सुरु होतात त्याप्रमाणे फलटण तालुक्यातील 4 ही साखर कारखान्यांचे बॉयलर प्रदीपन झाले असून दोन साखर कारखान्यांनी गाळप सुरु केले आहे, मात्र संततधार पावसाने ऊसाच्या क्षेत्रात जाता येणार नसल्याने ऊसाची तोडणी व रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे ऊसाची वाहतूक शक्य नसल्याने चारही साखर कारखान्यांचे गळीत हंगाम उशीराने सुरु करावे लागणार आहेत.
शेतातील सोयाबीन, चारा पिके, तुटणारा ऊस, भाजीपाला, फळबागा यासह काही प्रमाणात झालेल्या रब्बी ज्वारीच्या पेरण्यांचे नुकसान झाले आहे, अनेकांच्या घराच्या भिंती पडणे, जनावरांचे गोठे, शेत घरांचे नुकसान झाले आहे, नदी, ओढ्याच्या काठावरील राहती घरे, कच्ची घरे यांना फटका बसला आहे. प्रशासनाने या सर्वांचे पंचनामे करुन तातडीने अहवाल पाठविल्यास आपदग्रस्तांना नुकसान भरपाई मिळू शकेल त्यादृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत.
अनेक गावांत शेळ्या मेंढ्या, पोल्ट्री शेड, जनावरांचे गोठे येथेही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे, जनावरांच्या गोठ्यात शिरलेल्या पाण्याने जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे बरड येथे गोठ्यात बांधलेले एक वासरु सततच्या पाऊस व पाण्याने गारठून गोठ्यात मयत झाल्याचे आढळून आले आहे.
फलटण शहरातून आसू, बारामती, दहिवडी, पुसेगाव, पंढरपूर वगैरे भागात जाणारे रस्ते नदी, नाले, ओढ्यांना आलेल्या प्रचंड पुरामुळे बंद झाले होते, पंढरपूरकडे जाणारा रस्ता तर बुधवारी सायंकाळी 7 वाजले पासून आज गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद होता, आसू रस्त्यावर गोखळी पाटीसह अन्य दोन ठिकाणी रस्त्यावर पाणी होते, अगदी फलटण शहरालगत असलेल्या जाधववाडी गावाकडे जाणारा रस्ताही ओढ्याच्या पुरामुळे काही काळ बंद होता, त्यामुळे प्रवासी महिला, मुले यांचे खूप हाल झाले.
फलटण शहरातून जाणार्या बाणगंगा नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे शहराच्या शनीनगर, मलठण भागातील अनेक घरात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांची मोठी धावपळ झाली, राज्य शासन व नगर परिषद प्रशासन, स्थानिक नगरसेवक/नगरसेविका, सामाजिक कार्यकर्ते यांनी तातडीने हालचाल करुन आवश्यक असलेल्या कुटुंबांना तात्पुरत्या निवासाची व भोजनाची व्यवस्था करुन त्यांना दिलासा दिला आहे.
शहरातील हरिबुवा व दत्त मंदिरा लगतच्या पुलाचे लोखंडी कठडे वाहुन गेले आहेत. मुख्याधिकारी व स्थानिक नगरसेवकांनी पाहणी केल्यानंतर तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे फलटण-बारामती रस्त्यावरील पाहुणेवाडी लगतचा तात्पुरता पुल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने फलटण-बारामती मार्गावरील वाहतूक गोखळी मार्गे सुरु आहे.


No comments