सरकारी व खाजगी रुग्णालयात रुग्णांना रेमडेसिवीर मोफत उपलब्ध करून द्यावे - देवेंद्र फडणवीस

राज्यात रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis demands Remedisivir should be made available free of cost to patients in government and private hospitals
गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 2 ऑक्टोबर 2020) - संपूर्ण राज्यात रेमडेसिवीरची निर्माण झालेली प्रचंड टंचाई, त्यामुळे गरिब रूग्णांचे होत असलेले हाल, त्यातून दररोजच्या बळीसंख्येत सातत्याने होणारी वाढ, यात तातडीने हस्तक्षेप करीत गरीब रुग्णांना खाजगी आणि सरकारी रुग्णालयात हे औषध उपलब्ध करून द्यावं तसेच सर्व गरीब रुग्णांना सरकारी तसेच खाजगी रुग्णालयात सुद्धा रेमडेसिवीर मोफत उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात, राज्यात दर दिवशी सरासरी सुमारे २० हजार कोरोना रुग्णांची भर पडत आहे. सरासरी ४५० ने दररोज बळीसंख्या वाढते आहे. अशात रेमडेसिवीर हे उपचारातील एक महत्वाचे औषध असल्याने त्याचा पुरवठा सुरळीत राहील, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. परंतू अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची उपलब्धता नसल्याने गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य सरकार उपलब्धतेचे कितीही दावे करीत असले तरी रूग्णालयांकडून मात्र टंचाईचेच कारण रूग्णांना सांगितले जात आहे. त्यामुळे रूग्णालयांकडून रूग्णांना थेट केमिस्टकडे ते खरेदी करण्यासाठी जाण्यास सांगितले जात आहे. याची किंमत लक्षात घेता, ते सामान्यांच्या आवाक्यात नाही. परिणामी त्यांचे मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढले आहे.
रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी राज्य सरकारने मध्यंतरी प्रक्रिया राबविली. परंतू ती प्रक्रिया सदोष असल्याने अनेक जिल्ह्यातून खरेदी केलेला औषध साठा परत करावा लागला, असे वृत्त माध्यमांमध्ये आले आहे. रेमडेसिवीर अभावी रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
खरेदी योग्य झाली नसल्याने याच्या उपलब्धतेचा गुंता आणखी वाढला. परिणामी प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असून, त्यामुळे गरिबांचे सर्वाधिक हाल होत आहेत. अनेकांनी तर याचा गोरखधंदा सुरू केला आहे. एकिकडे गरिब रूग्णांचे मृत्यू आणि दुसरीकडे रेमडेसिवीरची काळाबाजारी ही स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे नवीन खरेदी प्रक्रिया राबवून जिल्हा प्रशासनांना हा साठा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच सर्व गरीब रुग्णांना सरकारी तसेच खाजगी रुग्णालयात सुद्धा रेमडेसिवीर मोफत उपलब्ध करून देण्यात यावे. याबाबत तातडीने आपण निर्देश प्रशासनाला द्यावेत आणि गरिब रूग्णांचे प्राण वाचवावे अशी विनंती करण्यात आली आहे.
No comments