Breaking News

चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळून 6 ठार

        पंढरपूर दि. 15 ऑक्टोबर (गंधवार्ता वृत्तसेवा) -:  चंद्रभागा नदीकिनाऱ्याला नव्याने बांधण्यात येत असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळली असून भिंतीच्या आडोशाला उभ्या असलेल्या 8 जणांपैकी 6 जणांचा भिंतीखाली सापडल्याने मृत्यू झाला आहे.

        चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटालगत घाटाचे काम सुरू होते. गेल्या काही दिवसातील पावसामुळे काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तेथील भिंत कोसळली.
घाटाच्या भिंतीच्या आडोशाला आठ जण बसले होते. भिंत कोसळल्यानंतर ते सर्व जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यामध्ये चार महिला व चार पुरुषांचा समावेश होता. सहा जणांचा जागीच मृत्यु झाला तर दोन जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले. मंगेश गोपाळ अभंगराव(वय 35), राधाबाई गोपाळ (वय 50), पिलू उमेश जगताप (वय 13), गोपाळ लक्ष्मण अभंगराव (वय 70), आणि दोन वारकरी महिलांचा मृत्यू झाला आहे.

        मुसळधार पावसामुळे शहरातील संत पेठ परिसरासह सखल भागात सर्वत्र पाणी साचले आहे. अनेक घरांमध्ये गुडघ्यापेक्षा जास्त पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबं अडचणीत आली आहेत. पंढरपूर शहरातील तालुका पोलीस ठाणे, सरगम चित्रपटगृह या दोन्ही रेल्वे पुलांखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. शहराच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. पंढरपूर तालुक्यात  टाकळी, कासेगाव भागात डाळिंब आणि द्राक्षबागांचं नुकसान झाले आहे.

No comments