Breaking News

कोरोना रुग्णांसाठी विक्रम विलास आणि मुधोजी मनमोहन राजवाडा उपलब्ध करुन देण्याची श्रीमंत रघुनाथराजे यांची घोषणा

 
Vikram Vilas and Mudhoji Manmohan Rajwada available for Corona patients

     फलटण  : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, फलटणचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी आपला सोनगाव, ता. फलटण येथील राजवाड्यासमान असणारा विक्रम विलास हा बंगला कोरोना केअर सेंटरसाठी उपलब्ध करुन देण्याची तयारी इंसिडन्ट कमांडर तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांचे निदर्शनास आणून दिली आहे.
        फलटण ग्रामीण व शहरातील लोकांच्या पाठीशी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आम्ही सर्वजण ठामपणे उभे आहोत, सोनगाव येथील बंगलाच काय गरज पडली तर फलटणकरांसाठी मुधोजी मनमोहन राजवाडा ही उघडून दिला जाईल याची ग्वाही देत सर्वतोपरी सहकार्य करण्यास आम्ही कमी पडणार नाही, फलटण करांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरुन जाऊ नये, असे प्रतिपादन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
           फलटण शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच वाढत्या रुग्ण संख्येला क्वारंटाइन करणे, कोरोना केअर सेंटर मध्ये ठेवणे यासाठी ग्रामीण भागात पुरेशा इमारती उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत, शाळा, विद्यालयांच्या इमारतीमध्ये स्वच्छता गृह पुरेशी नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना फलटण येथे आणून उपचार करावे लागत असल्याने ग्रामीण भागातील लोकांसाठी आपला बंगला वापरण्याची सूचना श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला केली आहे.
          सोनगाव येथील हा बंगला प्रशस्त, निसर्गरम्य वातावरणात आणि सर्व सुविधा असलेला आहे, येथे खालच्या मजल्यावर स्त्रियांची व वरच्या मजल्यावर पुरुष मंडळींची अशी एकूण १०० लोकांची व्यवस्था होऊ शकेल असे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.

No comments