Breaking News

कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

 

My Family My Responsibility campaign is important for effective control of the corona
    पुणे दि. 21: कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगतानाच  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रमाला सर्वांचा प्रतिसाद महत्वाचा ठरणार असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केले.
        बाणेर येथील युतिका सोसायटीमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापुरकर, डॉ. सुभाष साळुंखे, अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार, उपायुक्त नितीन उदास, सहाय्यक आयुक्त जयदीप पवार, आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ गणेश डमाळे, नगरसेविका ज्योतीताई कळमकर, बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
        आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे. पूर्वनिदान झाले तर मृत्यूचे प्रमाणही कमी होणार आहे. प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे. नागरिकांनी आपल्या घरी तपासणी व माहिती, सूचना आदींसाठी येणा-या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करावे. असे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी स्वंयशिस्त महत्त्वाची असल्याचे सांगून आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, स्वंयशिस्त पाळली तर आपण कोरोनाला रोखू शकतो, कोरोनाशी लढण्यापेक्षा कोरोना होवूच नये यासाठी प्रत्येकाने दक्षता घेण्याची गरज आहे. रोगप्रतिकारशक्ती चांगले ठेवण्यासाठी प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्यावी. प्रत्येकाने स्वत: सोबत इतरांच्याही आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. पुणे महानगरातील युतिकासारख्या सोसायट्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी  पुढाकार घेतला ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
        क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ गणेश डमाळे यांनी  बाणेर परिसरात  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहमे अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमाबाबतची माहिती दिली. युतिका सोसायटीच्या प्रतिमा येवलेकर यांनी सोसायटीने हाती घेतलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

No comments