छत्रपती शिवाजी महाराज कोविड केअर सेंटरचा फलटण येथे शुभारंभ
![]() |
| छत्रपती शिवाजी महाराज कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करताना डॉ.अस्मिता गावडे, प्रसाद काटकर, दिलीपसिंह भोसले, सुभाष शिंदे, व इतर |
जाधववडी (गंधवार्ता प्रतींनिधी) - मराठा क्रांती मोर्चा व महाराजा उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कोविड केअर सेंटरचे उद्घाटन गटविकास अधिकारी डॉ.अस्मिता गावडे यांचे हस्ते करण्यात आले. दरम्यान प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हे उभे केलेले कोविड सेंटर प्रशासनाला हस्तांतर करण्यात आले.
फलटण शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व त्यांच्या वर उपचार करणारी रुग्णालय या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण होत होती.तसेच त्यांना उपचार व ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. या मुळे प्रांताधिकारी डॉ.शिवाजी जगताप यांनी सर्वांना आवाहन केले होते की रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी सामाजिक संघटना तसेच दानशूर व्यक्ती यांनी पुढे येऊन प्रशासनाला मदत करावी या आवाहनाला साथ देत मराठा क्रांती मोर्चा फलटण व महाराजा उद्योग समूह यांनी संयुक्तिक पने हे ऑक्सिजन सह सुसज्ज असे 20 बेडचे रुग्णालय येथील "आनंदवन" स्व.हणमंतराव पवार हायस्कुल विवेकानंद नगर येथे उभारले असून त्याचा उद्घाटन सोहळा आज शनिवार दि.12 सप्टेंबर रोजी सोशल डिस्टन्स पाळून मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडला.
या वेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मराठा क्रांती मोर्चाचे मार्गदर्शक सुभाषराव शिंदे यांच्या हस्ते झाले.तर या कोविड केअर सेंटर ठिकाणी महाराजा उद्योग समूहाचे शिल्पकार व मराठा क्रांती मोर्चाचे मार्गदर्शक दिलीपसिंह भोसले,अशोकराव जाधव,व फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला.दरम्यान या वेळी फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.अस्मिता गावडे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.व या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य मार्गदर्शक ज्ञानेश्वर उर्फ माऊली सावंत व उद्योजक रणजितसिंह भोसले यांच्या हस्ते या छत्रपती शिवाजी महाराज कोविड सेंटर चे हस्तांतरण करण्यात आले. या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे मार्गदर्शक व समनव्यक विरसेन कदम,अशोक शिंदे,अभिजित सूर्यवंशी(बेडके),शंभूराज बोबडे,पोपटराव बर्गे,उपस्थित होते.
![]() |
| कोविड केअर सेंटर शुभारंभ प्रसंगी बोलताना डॉ.अस्मिता गावडे व्यासपीठावर प्रसाद काटकर,दिलीपसिंह भोसले,सुभाष शिंदे, व इतर |
या उद्घाटन कार्यक्रमानंतर बोलताना डॉ.अस्मिता गावडे यांनी सांगितले की आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून हे कोविड सेंटर उभारले गेले असून या सेंटर मध्ये कोविड रुग्णांना सेवा देण्यासाठी आम्ही व आमचे इतर सहकारी कमी पडणार नाहीत. ज्या उदात्त हेतूने मराठा क्रांती मोर्चा व महाराजा उद्योग समूहाने मोठ्या कष्टाने उभे केलेले छत्रपती शिवाजी महाराज कोविड सेंटर समाजातील गरीब व गरजू लोकांना उपचारासाठी कुठेही कमी पडणार नाही. असे डॉ.गावडे यांनी स्पष्ट केले आहे.
या वेळी बोलताना प्रसाद काटकर यांनी सांगितले की या पुढे या छत्रपती शिवाजी महाराज कोविड सेंटरमध्ये जे अद्ययावत असलेले ऑक्सिजन चे बेड अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी असून या प्रमाणेच इतर संस्था,सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तींनी असे तात्पुरते रुग्णालय उभारावेत,येत्या एक ते दोन महिन्यात खूप मोठ्या प्रमाणावर कोविड बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढणार आहे. दरम्यान या मुळे आरोग्य यंत्रणा उभी राहिली तर त्याचा फायदा आपल्या लोकांना होणार आहे.
दरम्यान या वेळी उपस्थित असलेल्या भूलतज्ञ डॉ.सुनीता निंबाळकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की हा आजार होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी शक्यतो घराबाहेर पडू नका,पडल्यास मास्क,सॅनिटायझर चा वापर करा,हे विषाणू नाक,तोंड,डोळे,व कान या मार्गे आपल्या शरीरात प्रवेश करतात तर जास्त वेळा हे विषाणू नाक व तोंड या दोन्ही ठिकाणांहून प्रवेश करीत असतात या मुळे मास्क किंवा स्वच्छ रुमालाने आपले नाक व तोंड झाकले जाईल याची काळजी घ्या. तसेच वारंवार मास्क अथवा रुमालाला हात लावू नका.आपण आपले हात कुठेही ठेवतो किंवा लावतो या वेळी हाताला ते विषाणू लागून ते मास्क वरती जाऊ शकतात व त्या मास्कच्या माध्यमातून आपल्या नाका, तोंडा मार्गे शरीरात प्रवेश करू शकतात या मुळे खबरदारी घ्यावी असे आवाहन डॉ.निंबाळकर यांनी केले आहे.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे मार्गदर्शक दिलीपसिंह भोसले यांनी आपले विचार व्यक्त केले या वेळी त्यांनी सांगितले की महाराष्ट्रा बरोबरच सातारा जिल्हा व फलटण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे हॉस्पिटल, ऑक्सीजन युक्त बेड कमी पडत आहेत. पैसे असूनही बेड उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार मराठा क्रांती मोर्चा व महाराजा उद्योग समूहाने सहकार्याने आज ऑक्सिजन युक्त वीस बेड असलेले सुसज्ज असे छत्रपती शिवाजी महाराज कोवीड केअर सेंटर उभारून शासनाकडे सुपूर्त करीत आहोत. अजून गरज भासल्यास वीस बेडची व्यवस्था केली जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चा ने उभारलेले महाराष्ट्रातील पहिले कोवीड सेंटर असून, महाराजा उद्योग समूह या कामी नेहमीच आपल्या पाठीशी राहील असे महाराजा उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले या प्रसंगी सांगितले.
या वेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.प्रस्तावित सादर करताना ज्ञानेश्वर उर्फ माऊली सावंत यांनी सांगितले की समाजाच्या विविध मागण्यांसाठी तालुका पातळीवरील फलटण मध्ये अभूतपूर्व मोर्चा उभा करणारा मराठा क्रांती मोर्चा आज कोरोणा च्या काळात मराठा व इतर समाजातील गोरगरीब,व गरजूंना वैद्यकीय मदत हवी या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज कोविड केअर सेंटर उभारलेले असून हे सुसज्ज असे कोविड रुग्णालय आज शासनाकडे सुपूर्द करीत आहोत. मराठा क्रांती मोर्चा नेहमीच यापुढेही आवश्यक ती मदत करण्यासाठी कमी पडणार नाही. असे प्रतिपादन मराठा क्रांती मोर्चा चे मुख्य मार्गदर्शक ज्ञानेश्वर उर्फ माऊली सावंत यांनी प्रास्ताविकात केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप चव्हाण यांनी तर आभार जयकुमार शिंदे यांनी मानले.या वेळी तुषारभाई गांधी, नितीन भय्या भोसले,अनुप शहा,संदीप जगताप,उमेश निंबाळकर,प्रवीण शिंदे,राजेंद्र रेपाळ,आढाव,संतोष सावंत,व सर्व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक,मार्गदर्शक, तसेच सदगुरू नागरी सहकारी पतसंस्था, व महाराजा मल्टिस्टेट चे अधिकारी, कर्मचारी, सदगुरू शिक्षण संस्था व ब्रिलियंट इंग्लिश मिडियम स्कुल व हणमंतराव पवार हायस्कुल यांचे सर्व शिक्षक,कर्मचारी वृंद या कार्यक्रमाला उपस्थित होते


No comments