ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

Actress Ashalata Wabgaonkar passes away
गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 22 सप्टेंबर ) - ज्येष्ठ अभिनेत्री आशालता बावगावकर यांचं आज निधन झालं. त्या ७९ वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथंच आज सकाळी पावणे पाचच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.
'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. प्रकृती बिघडल्यानंतर आशालता यांना 16 सप्टेंबर रोजी प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशालता वाबगावकर यांची ऑक्सिजन लेव्हल कमी जास्त होत होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
वाई जवळच्या हिंगोली या गावात एका फार्म हाऊसमध्ये या मालिकेचे शुटिंग सुरू होे. आशालता या गेली काही दिवस या शुटिंगसाठी तिथेच होत्या. या मालिकेत एका गाण्याचे शुटिंग सुरू होते. तिथे मुंबईवरून काही कलाकारांचा ग्रुप आला होता. त्याच वेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

आशालता वाबगावकर या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. अनेक चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर त्यांनी त्यांच्या मोर्चा मालिकांकडे वळविला होता. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत त्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होत्या. आशालता यांनी कोकणी व मराठी चित्रपटांतून अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांनी विविध भाषांतील १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. छोट्या पडद्यावरील अनेक टीव्ही मालिकांमध्येही त्या झळकल्या होत्या. संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली. त्यानंतर 'गुंतता हृदय हे, रायगडाला जेव्हा जाग येते, चिन्ना आणि महानंदा’ अशा नाटकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. बासू चटर्जी यांच्या 'अपने पराये' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचं नामांकनही मिळालं होतं. मराठी चित्रपटसृष्टीत 'उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया, माहेरची साडी' हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.
No comments