शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संभाजी ब्रिगेड मैदानात ; भेसळखोरांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी
![]() |
तहसीलदार यांना निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी |
फलटण - शेतकऱ्यांच्या दुधाला आधारभूत भाव, पशुखाद्य किंमतीवर नियंत्रण व शेतीसाठी लागणारी बि-बियाणे, रासायनिक खते व औषधे यामधील भेसळ व किंमतवर नियंत्रण ठेवणे बाबत निवेदन संभाजी ब्रिगेड फलटण तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले. या प्रसंगी संभाजी ब्रिगेड सातारा जिल्हा अध्यक्ष विशाल शिंदे, सातारा जिल्हा सरचिटणीस प्रदीप घाडगे, फलटण शहर अध्यक्ष संग्राम साळुंखे, बजीरंग भगत,वैभव सस्ते,तुषार सस्ते,संतोष जाधव,अजित शिंदे,मनोज जगताप,गोट्या शिंदे,सचिन पवार,वैभव साळुंखे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी दुध दर वाढीचा ठोस निर्णय त्वरीत घ्यावा. तसेच कोरोना महामारीच्या नावाखाली दुधाचे 35 वरील दर 15 ते 18 वर आलेले आहेत. आज दुग्धजन्य पदार्थ पुर्वीच्या दराने मोठ्या प्रमाणात विक्री होत असून, दुध उत्पादकांना आपले दुध कवडीमोल दरामध्ये दुध संघ चालकांना घालावे लागत आहे. तसेच पशुखाद्यावरती शासनाचे कोणतेच नियंत्रण नासल्याने पशुखाद्याची निर्मिती करणारे, दुधाचे दर कमी होऊन देखील पशुखाद्य चढ्या भावाने विकत आहेत. तसेच दुधाचा 1-2 रूपयाने भाव वाढला तर पशुखाद्याचे भरमसाठ भाव वाढवतात. यावर शासन पातळीवर निर्णय घेऊन सरकारने किंमती नियंत्रीत ठेवाव्यात.
रासायनिक खते, औषधे व बि-बियाणे यामधील भेसळ व भरमसाठ किंमती यावर कृषी विभागाच्या माध्यमातून कारवाई करून भेसळखोर लोकांवर मोक्का अंतर्गत शिक्षेचा कायदा करण्यात यावा. व शेतकऱ्यांना शासन स्तरावर भेसळ ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे.
तसेच, खाजगी हाॅस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया व संसर्गजन्य आजारावरील उपचारांच्या खर्चाची माहिती हाॅस्पिटल मधील नोटिस बोर्डवरती लोकांना माहितीसाठी प्रसारित करण्यात यावी. अशा मागण्यांची दोन निवेदन देण्यात आली. जर या मागण्यांवर सरकारने त्वरीत निर्णय घेतला नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर तिव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.
No comments