Breaking News

कोविड हॉस्पिटल करण्यास विरोध करणाऱ्या डॉक्टर व हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी - मनसे

प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांना निवेदन देताना मनसेचे युवराज शिंदे

      फलटण :-  येथील धर्मादाय व शासकीय विभागाशी निगडित अनुदानचा  लाभ उठवणाऱ्या हॉस्पिटलचे कोव्हिड रुग्णासाठी अधिग्रहण करण्यास विरोध करणाऱ्या डॉक्टर व राजकीय पुढारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी केली  आहे.

        फलटण तालुक्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस  मोठ्या प्रमाणात वाढत असून, फलटण तालुक्यात अद्यापही जिल्हा व स्थानिक प्रशासनाकडून धर्मादाय यांच्याकडे नोंदणीकृत असलेली तसेच शासनाकडून विविध आर्थिक  लाभ घेत असलेली अनेक हॉस्पिटल असून, सध्याच्या काळात अशी धर्मादाय व शासकीय निगडीत हॉस्पिटल अधिग्रहण करण्यात आली नाहीत,  अशी हॉस्पिटल  तातडीने  अधिग्रहित करून येथे  कोबी रुग्णांवर उपचार सुरू करण्यात यावा अशी मागणी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने युवराज शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह स्थानिक व जिल्हा प्रशासन यांना निवेदन देऊन केली आहे.

        या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण देशात अशी हॉस्पिटल अधिग्रहण करून रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये अधिक उपचार करण्यासाठी दाखल केले जात आहे, परंतु ऑगस्टचा शेवटचा आठवडा आला तरी, सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह व  फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी आज अखेर तालुक्यातील कोव्हिड रुग्णांसाठी कोणत्याही प्रकारचे धर्मदाय निगडित अथवा शासनाची निगडित हॉस्पिटल अधिग्रहण केले नसून, यामुळे फलटण तालुक्यातील  कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यासाठी, आज अखेर एकही हॉस्पिटल अधिग्रहण नसल्याचे चित्र असून, यामागे हा मोठा राजकीय दबाव असून यामुळे हॉस्पिटल अधिग्रहण केले जात नाही.

            शहरातील धर्मादाय विभागाशी निगडित हॉस्पिटल अधिग्रहण करण्याचे सोडून इतर कोणतेही लाभ मिळत नसणारे खाजगी हॉस्पिटल नियमबाह्यपणे अधिग्रहण करण्याचा स्थानिक व जिल्हा प्रशासनाचा डाव असून, हा चुकीचा व नियमबाह्य आणि राजकीय दबावाखाली होत असल्याने, प्रशासनाने कोणत्याही राजकीय पुढाऱ्याच्या दबावाला बळी न पडता, धर्मदाय विभागाशी व शासनाशी निगडित लाभ उठवित असलेले हॉस्पिटल अधिग्रहण करण्यात यावे. तसेच या हॉस्पिटल अधिग्रहणास विरोध करणाऱ्या डॉक्टर व प्रशासनावर राजकीय दबाव आणणाऱ्या  पुढार्‍यांवर कोणतीही मुलाहिजा न ठेवता  तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे. फलटण तालुक्यातील कोव्हिड रुग्ण उपचाराअभावी दगावल्यास याची सर्व जबाबदारी स्थानिक व जिल्हा प्रशासनाची राहील याबाबत न्यायालयात दाद मागण्यास अथवा आंदोलन करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भाग पाडू नये असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.


No comments