Breaking News

दक्षता घेत, कोरोना सोबत जगायला शिकले पाहिजे- श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

पुस्तक प्रकाशन प्रसंगी बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, प्रांत शिवाजीराव जगताप 

            फलटण दि. 20 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) -   पूर्वी जगाला भीती असायची ती आणि युद्धाची परंतु सध्या कोरोना विषाणू ची भीती सर्व जगाला भेडसावत आहे. आत्तापर्यंत जगामध्ये या विषाणू विषयी 100% खरी माहिती कोणाकडेही नाही, प्रत्येकाने आपले तर्क मांडले आहेत, त्यामुळे करायचे काय? हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. फक्त  काळजी घेणे महत्वाचे आहे. आता कोरोना सोबत जगण्याची सवय लावून घेतली पाहिजे. दक्षता घेत जगायला शिकले पाहिजे. कोरोना  सारखे लक्षण असलेले 75 हून अधिक विषाणू आज अस्तित्वात असल्यामुळे दक्षता घेणे हा एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. 

        संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणू थैमान घालत असतानाच  लेखणीच्या माध्यमातून  विचारवंत लोकांनी आपले विचार या कोरोना विषयावर मांडलेले आहेत, कोरोना विषाणूवर  आधारित, 'प्रवास कोरोनाचा' या पुस्तकाचे प्रकाशन विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते फलटण येथे  करण्यात आले.  याप्रसंगी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते.  हे प्रकाशन कलारत्न सहकारी मुद्रणालयाच्या प्रांगणामध्ये पार पडले. या पुस्तकाचे प्रकाशक अनुबंध कला मंडळ फलटण असून याचे मुद्रण कलारत्न सहकारी मुद्रणालय यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक,  पुस्तकाचे संपादक प्राचार्य रवींद्र येवले सर यांनी केले. उपस्थितांना 'प्रवास कोरोनाचा' या पुस्तका विषयी माहिती ब्रह्मानंद पराडकर यांनी दिली .

        पुस्तक प्रकाशन प्रसंगी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर  म्हणाले की, समाजामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे, याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.  सोशल डिस्टंसिंगचा वापर केला पाहिजे.  पूर्वी अणु युद्धाची भीती वाटायची. आता सगळेच देश ताकदवान आहेत, त्यामुळे एकामेकाला घाबरतात. आता, अणु युद्ध  होणार नाही, परंतु समाजाला जी भीती आहे, ती या  कोरोना विषाणूपासून आहे, या कोरोना विषाणूच्या संदर्भात जास्त बोलायचं म्हणजे, आत्तापर्यंत जगामध्ये या विषाणू विषयी 100% खरी माहिती कोणाकडेही नाही, प्रत्येकाने आपला तर्क मांडले आहेत, त्यामुळे करायचे काय आता?  हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. फक्त  काळजी घेणे महत्वाचे आहे. विटामिन सी च्या गोळ्या खाणे, आवळ्याचा रस पिणे, लिंबू पाणी घेणे, वाफारा घेणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टंसिंग च्या नियमांचे पालन करणे, गरजेपुरता लोकांशी संवाद साधणे, जास्त वेळ घरात रहाणे, लहान मुलांची काळजी घेणे हे पर्याय आपल्यासमोर राहिलेला आहेत . म्हणजेच काय तर आता कोरोना सोबत जगण्याची सवय लावून घेतली पाहिजे. दक्षता घेत जगायला शिकले पाहिजे. कोरोना  सारखे लक्षण असलेले 75 हून अधिक विषाणू आज अस्तित्वात असल्यामुळे दक्षता घेणे हा एकमेव पर्याय आहे. 

        'प्रवास कोरोनाचा' हे पुस्तक समाजाला प्रेरणा देण्याचे काम करेल. दिग्गज लोकांनी या मध्ये लिखाण केले, त्यांचे अनुभव मांडले, हा अतिशय चांगला उपक्रम आहे. त्याचबरोबर आता नवीन पिढीमध्ये ब्लॉग रायटिंग विषयक आकर्षण आहे. मीही ब्लॉग वाचण्याचे काम करत असतो. हे पुस्तक सॉफ्ट कॉपी च्या  माध्यमातून ब्लॉग वर टाकण्यात यावे, व्हाट्सअप च्या माध्यमातून इतर लोकांना वाचण्याकरिता उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली. 

        'प्रवास कोरोनाचा'  या पुस्तकाची समाजाला गरज आहे, तसेच समाजा मधील नागरिकांनी कोरोनाची खूप धास्ती घेतली आहे. आपण कोरोना  बाधित  रुग्णांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळताच, काही  लोकांना  हृदय विकाराचा झटके आले आहेत. हे दृश्य आपल्या सर्वांसाठी भयावह आहे. अशा परीस्थिती मध्ये विषाणू चा प्रसार होऊ नये म्हणून रुग्णाची काळजी घ्यावी. का त्याच्या परिवाराला सांभाळावे ही द्विधा मनस्थिती आहे. हे काम करत असताना  येणाऱ्या सामाजिक व प्रशासकीय अडचणी यांचा समतोल राखणे, या करिता आम्हाला मोठा संघर्ष करावा लागत आहे. आणि यातून येणारे अनुभव आपण पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणावेत, या करिता मी सहकार मुद्रणालयाच्या  चेअरमन यांना,   विनंती करतो की आपण आमच्या अनुभवाचे एक पुस्तक प्रकाशित करावे, जेणे करून शासन व प्रशासन यांची काम करत असतानाची परिस्थिती समोर येईल असे प्रतिपादन प्रांत अधिकारी श्री शिवाजीराव जगताप यांनी केले.

        कलारत्न सहकारी मुद्रणालयाच्या  माध्यमातून चांगले कवी, विचारवंत, कलावंत,लेखक, यांना प्रकाश झोतात आणण्याचे काम आपण करत आहोत. तसेच या पुस्तकाच्या माध्यमातून काम करत असताना, असंख्य लोकांशी संवाद झाला. परंतु सर्व लेखकांचे लेख आपल्याला या पुस्तकात प्रकाशित करता आले नाहीत, येणाऱ्या काळा मध्ये अजून नवीन पुस्तके आपण वाचकांसाठी आणणार आहोत. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनुभवांचे  पुस्तक आम्ही लवकरात लवकर प्रकाशित करू असे आश्वासन कलारत्न सहकारी मुद्रणालयाचे चेअरमन संदीपकुमार जाधव यांनी दिले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल डफळ यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे कार्यकारी व्यवस्थापक निखिल येवले यांनी केले. या कार्यक्रमाला कलारत्न सहकारी मुद्रणालयाचे संचालक व  कर्मचारी ,अनुबंध कला  मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments