महिलांना समान संधी व शिक्षण मोफत देणारे महाराज साहेब मालोजीराजे
जातिभेद नष्ट करणारे, महिलांना समानतेची वागणूक देणारे, महिलांची पडदा पद्धत बंद करणारे, मुलींना मॅट्रिक पर्यंत शिक्षण मोफत देणारे फलटण संस्थानचे भूतपूर्व अधिपती स्वर्गीय श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांची आज जयंती त्यानिमित्त... - ॲड. रोहित शाम अहिवळे
शिवपूर्वकालात महाराष्ट्रातील जी पुरातन नामवंत घराणी राज्य करत होती, त्यामध्ये फलटणचे नाईक निंबाळकर घराणे हे अग्रेसर होते. 12 व्या शतकापासून या घराण्याचा इतिहास आहे. कित्येक शतके महाराष्ट्रच्या भूमीवर नाईक निंबाळकर घराणे राज्य करत होते. या प्रदीर्घ कालखंडात या घराण्यात वनंगपाल, वणगोजीराव, बाजीराव असे अनेक पराक्रमी पुरुष नाईक-निंबाळकर घराण्यात होऊन गेले. छत्रपतींचे भोसले घराणे व लखुजी जाधवांचे घराणे या दोन्ही घराण्यांचे नाईक निंबाळकरांचे फार पूर्वीपासून नात्यागोत्यांचे संबंध चालत आलेले आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या घराण्यातील निंबराज' हे 13 व्या शतकातील मूळ पुरुष तर मालोजीराजे हे 20 व्या शतकातील शेवटचे राजपुरुष होते. श्रीमंत मालोजीराजे यांना महाराजसाहेब या नावानेच सर्व जण ओळखतात. https://www.gandhawarta.com/
श्रीमंत मालोजीराजे यांचा जन्म गणेश चतुर्थी शके १८१८ सन १८९६ रोजी निंभोरे येथे झाला. महाराजसाहेबांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खाजगी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाल्यानंतर मुधोजीराजे यांनी त्यांना राजकोट (गुजरात) येथे राजकुमारांच्या कॉलेजमध्ये पाठवले. तेथे त्यांनी सामान्य प्रशासन, याशिवाय घोड्यावर बसणे, बंदुक चालवणे, शिकार करणे हे विषय आत्मसात केले.
जातीभेद नष्ट केले
१९१६ साली महाराजसाहेबांनी संस्थानची सुत्रे दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्रीमंत मालोजीराजे यांनी स्वीकारली. मालोजीराजांचा राज्यभिषेक झाल्यानंतर त्यांनी संस्थानात पुरोगामी निर्णय घेतले. राज्याभिषेक निमित्त भरलेल्या दरबारात त्यांनी संस्थानात कोणत्याही प्रकारचे जातीभेद मानले जाणार नाहीत. प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेवर संधी दिली जाईल, असे जाहीर केले. त्यावेळी ते भाषणात म्हणाले होते - "आजच्या या दरबाराच्या निमित्ताने आम्ही स्त्रियांचे समान हक्क मान्य करणे, हरिजनांना दरबारात व मंदिरात प्रवेश देणे अशा अनेक सुधारणा करणार आहोत'.https://www.gandhawarta.com/
पहिल्याच दरबारात जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी फलटण संस्थानमधील फलटणचे आराध्य दैवत श्रीराम मंदिर व इतर मंदिरे अस्पृथ्यांसाठी खुली केली. एवढेच नव्हे तर त्यांनी 1929 साली कायदेमंडळात अहिवळे या दलित कार्यकर्त्यास सदस्य म्हणून नियुक्त केले.
महिलांना समानतेची संधी व पडदा पद्धत बंद
ज्या दिवशी मालोजीराजांनी संस्थानाची सूत्रे हातात घेतली त्याच दिवशी भरलेल्या दरबारात आपल्या समवेत आपल्या राणीसाहेब लक्ष्मी देवी यांना दरबारात स्थान देऊन त्यांनी महिलांना समानतेची वागणूक देण्यास सुरुवात केली. याच दरबारात श्रीमंत सौ.लक्ष्मीदेवी राणीसाहेब यांनी स्त्रियांनी आपला चेहरा झाकून टाकणारी पडदा पद्धतीचा त्याग करावा, असे आवाहन केले. हे पुरोगामी निर्णय त्या काळी तसे धाडसाचेच होते.
मुलींना मॅट्रिक पर्यंत शिक्षण मोफत
महाराजसाहेब हे विद्याप्रेमी होते. तसेच ते विद्वानांचा आदरही करत. त्यांनी संस्थानातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना आपल्या खाजगीतून किंवा संस्थानातून हवेशीर व स्वच्छ परिसरातील इमारती उपलब्ध करुन दिल्या होत्या. खेडोपाडीही अशीच व्यवस्था उपलब्ध करुन दिली होती.
मुलांप्रमाणे मुलींनीही मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घ्यावे, असे महाराजसाहेबांना वाटे. पण त्याकाळी मुली सहसा चौथीच्या पुढे जातच नसत. यासाठी श्रीमंत मालोजीराजे यांनी आपली कन्या श्रीमंत सरोजिनीदेवी (आक्कासाहेब) यांचे नाव मुधोजी हायस्कूलमध्ये दाखल केले. अक्कासाहेब हायस्कुल मध्ये शिकत आहेत, हे पाहून एकेक मुली हायस्कूलमध्ये प्रवेश घेऊ लागल्या. याचवेळी महाराज साहेबांनी मुलींना मॅट्रीकपर्यंतचे शिक्षण मोफत देणार असल्याचे जाहीर केले. याचा लाभ संस्थानातील गरीब व श्रीमंत दोन्ही घरच्या मुलींना १९४८ पर्यंत मिळाला.
गुप्त दान देणारे महाराज
महाराजसाहेबांनी संस्थानातील संस्थाप्रमाणे बाहेरील संस्थानांही देणग्या दिल्या. पण हे दान गुप्त असे. त्यापैकी काही संस्थांच्या देणग्या लोकांना समजल्या. त्यात बनारस हिंदू विश्वविद्यालय, रयत शिक्षण संस्था, शिवाजी मिलीटरी स्कूल, हिराबाग पुणे आदी संस्था, गंधर्व नाटक मंडळी यांनाही महाराजसाहेबांनी आश्रय दिला. याशिवाय विनोबा भावे भूदान चळवळीला एक हजार एकर जमिनही दिली. तर महात्मा गांधी स्मारक फंडास आपला राजवाडा देऊन टाकला. (पुढे देखभालीचा खर्च झेपेना म्हणून स्मारक समितीने तो परत केला ही गोष्ट निराळी.) महाराजसाहेब हे गुण ग्राहक होते. विचारवंतांच्या संगतीत राहणे त्यांना आवडे. यासाठी त्यांनी डॉ.राधाकृष्णन, सर विश्वेश्वरय्या, साहित्यसम्राट न.चिं.केतकर, रविकिरण मंडळाचे कवी यशवंत, कवी गिरीश, माधव ज्युलीयन, आचार्य अत्रे आदींना वेळोवेळी फलटण मुक्कामास आणून त्यांचा यथोचित पाहुणचार केला आणि त्यांच्या सान्निध्यात राहण्याची संधी साधली व ती प्रजेलाही मिळवून दिली.
महर्षी कर्वे यांना ५० रू मानधन
महर्षि आण्णासाहेब कर्वे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्त महाराज साहेबांनी त्यांचा भव्य सत्कार केला. त्यांना शाल, श्रीफळ, व थैली दिली. त्याचबरोबर त्यांना मासिक ५० रु. मानधन मंजूर केले. याचवेळी फलटण संस्थानातील प्रत्येक ६० वर्षावरील व्यक्तीस आण्णासाहेबांच्या हस्ते एकेक चांदीचा पेला भेट म्हणून देण्यात आला. पुढे आण्णासाहेबांनी थैली आणि पेन्शन आपल्या हिंगणे संस्थेस देऊन टाकली ही गोष्ट निराळी. कला प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्याचा बालगंधर्वाचाही महाराजसाहेबांनी उचित सत्कार केला. शिवाय पडत्या काळात राजाश्रयही दिला. यावेळी ३-४ महिने गंधर्व नाटक मंडळी फलटण मुक्काम करुन होती.
संस्थान विलीन करून खजाना सरकारकडे सुपूर्द केला
मालोजीराजांना देशातील व जगातील राजकीय प्रवाहांची चांगली जाण होती. देशाच्या स्वातंत्र्यानंतर संस्थानांच्या विलीनीकरणांचा प्रश्न निर्माण झाला. फलटण संस्थान लहान असले तरी ते प्रगतशील होते. त्याचा खजिना भरलेला होता. अनेक संस्थानिकांचा विलिनीकरण नको होते. असे असूनही मालोजीराजांनी राष्ट्रीय भावनेने आपल्या संस्थानाच्या विलिनीकरणास आनंदाने संमती दिली. तिजोरीतील सहासष्ट लाख रुपयांची रक्कम मुंबई सरकारकडे सुपूर्त केली. ही त्यागमय वृत्ती महामानवाशिवाय दुसर्या ठिकाणी पहावयास मिळत नाही
महाराज साहेब बांधकाम मंत्री
फलटण येथील मुधोजी क्लबमध्येही महाराजसाहेब अधून मधून येत व दोन-चार ब्रीजचे डाव खेळून सभासदांशी गप्पागोष्टीही करत. किशोरसिंह ट्रॉफिच्या क्रिकेट मॅचला ते हमखास येऊन बसत. संस्थान विलीन केल्यानंतर महाराजसाहेबांना खेर मंत्रीमंडळात विकासमंत्री व नंतरच्या मोरारजी देसाई यांच्या मंत्रीमंडळात बांधकाममंत्री म्हणून समाजसेवेची संधी मिळाली. या काळात त्यांनी प्रामुख्याने कोयना धरण, हेळवाक येथील जलविद्युत प्रकल्प, मुंबईतील मंत्रालयाची भव्य वास्तू, प्रतापगडावरील शिवछत्रपतींचा अश्वारुढ पुतळा, खंडाळ्यातील वीर धरण बाणगंगा धरण, आंधळी धरण, उकाई प्रकल्प (गुजरात) यासह अनेक विकासकामे केली.
फलटण येथील श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय येथे असणाऱ्या मागासवर्गीय वसतीगृहामध्ये दरवर्षी गणेश चतुर्थीला गणेशाचे आगमन होते, राजघराण्याचे वतीने येथे गणपती बसवला जातो. नाईक निंबाळकर राजघराण्यातील व्यक्ती हजर राहून गणेशाची स्थापना करते. गणपती बसवल्यानंतर राजघराण्यातील व्यक्ती वसतिगृहातील मुलांच्या समवेत प्रसाद व मिष्टान्नाचे सेवन करते. ही परंपरा आजही अखंडित ठेवण्यात आली आहे.
कारखाने उभारणीत मोठे योगदान
महाराजसाहेबांनी श्रीराम कारखाना सुरू केलाच पण त्याबरोबरच माळेगाव, सोमेश्वर या कारखान्यांच्या उभारणीतही मोठे योगदान दिले अशा प्रकार १९१६ ते १९७७ पर्यंत अखंडपणे समाजसेवा, समाजहित, करत आणि गरजूंना मदतीचा हात देत फलटणच्या रयतेचा जानता राजा १४ मे १९७७ रोजी आपल्यातुन निघुन गेले.
आज श्रीमंत मालोजीराजे यांची जयंती साजरी होत असताना त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
- ॲड. रोहित शाम अहिवळे
No comments