Breaking News

फलटण शहर व तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करून कोरोना संशयितांची चाचणी करा - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

 

        Survey every family in Phaltan city and taluka and test corona suspects - Shrimant Ramraje Naik Nimbalkar
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - शहरासह तालुक्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने शहर व तालुक्यात आतापर्यंत अधिक रुग्ण आढळलेली गावे किंवा शहरातील त्या त्या भागात प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करून संशयास्पद आढळलेल्या व्यक्तींची चाचणी करण्याच्या सूचना विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिल्या आहेत.
        फलटण शासकीय विश्रामधामावर श्रीमंत रामराजे यांनी बोलाविलेल्या बैठकीस आमदार दीपक चव्हाण,प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप,पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, प्रभारी तहसीलदार रमेश पाटील, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.व्ही.एल.धवन,डॉ.सुभाष गायकवाड,पोलिस निरीक्षक प्रताप पोमण,पोलिस निरीक्षक नितीन सावंत,डॉ.संजय राऊत,राजाळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजीव जगदाळे उपस्थित होते.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी असलेल्या व्यवस्थेचा आढावा घेताना आवश्यक असेल ती साधनसामुग्री आपल्या स्थानिक विकास निधीतून अथवा अन्य संस्था व व्यक्तींच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत कोणत्याही परिस्थितीत दाखल रुग्णांवर व्यवस्थित उपचार झाले पाहिजेत,अशा स्पष्ट सूचना यावेळी श्रीमंत रामराजे यांनी दिल्या.
        नगरपरिषद जुन्या वसतिगृहाच्या जागेत उभारण्यात आलेल्या कोविड उपचार केंद्राची क्षमता 40 ची आहे. तथापि त्यामध्ये 100 पर्यंत वाढ करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन तेथील जागेत शक्य नसेल तर अन्यत्र ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. उपजिल्हा रुग्णालयात निर्माण करण्यात आलेले 30 बेडच्या क्षमतेचे कोविड उपचार केंद्र तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना देताना सद्य: स्थितीतील कोरोना उपचार केंद्र व क्वारंटाइन केंद्राची सविस्तर माहिती घेऊन तेथे आवश्यक त्या वैद्यकीय,आरोग्य व निवासाच्या सर्व सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही रामराजे यांनी दिल्या. आवश्यक असेल तर प्रशासनाने निश्चित केलेली खासगी रुग्णालये कोरोना उपचार केंद्र म्हणून कार्यान्वित करण्याबाबतही श्रीमंत रामराजे यांनी सूचना दिल्या.


No comments