पंढरपूर येथे विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने राजगृहावरील हल्ल्याचा निषेध
पंढरपूर - राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेले ‘राजगृह’ ही वास्तू समस्त पुरोगामी लोकशाहीवादी जनतेची ‘अस्मिता’ असून वैचारिक ‘प्रतिक’ आहे. जगामध्ये मुंबई येथील राजगृह हे जागतिक प्रेरणास्थान असून लोकशाही राष्ट्रामधील आंबेडकरी विचारधारेची ‘वैचारिक सनद’ आहे.
भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संघर्षमय जीवनात समस्त भारतीय महिला, पुरुष यांना समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय मिळवून देण्यासाठी जो विविधांगी संघर्ष केला त्या संघर्षाचा वैचारिक ठेवा पुस्तकरूपाने लिखित स्वरुपात ठेवण्यासाठी(ग्रंथालयाकरिता) ‘राजगृह’ या वास्तुची निर्मिती केलेली आहे. ‘राजगृह’ हे आंबेडकरवादी विचाराचे दिशानिर्देशनाचे केंद्र आहे. अशा वैचारिक केंद्रावर दिनांक 07 जुलै 2020 रोजी सायंकाळी अज्ञाताकडून हल्ला झालेला आहे. त्यामुळे समस्त लोकशाहीवादी जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत. सदरचा हल्ला लोकशाही मूल्यावर केलेला हल्ला आहे अशी आमची धारणा व भावना झालेली आहे. त्यामुळे आम्ही विविध संघटनांचे पदाधिकारी सनदशीर मार्गाने या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत.
तरी सदर निंद्य प्रकाराची महाराष्ट्र शासनाने गंभीरपणे दाखल घेवून, चौकशी करून हल्ला करणा-या व हल्ल्याचा कट रचना-या मनुवादी अतिरेकी शक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशा स्वरूपाचे निवेदन वंचित बहुजन आघाडी, रिपाइं(आ), दलित स्वयंसेवक संघ, संभाजी ब्रिगेड, बळीराजा शेतकरी संघटना, श्रमिक मुक्ती दल, अण्णाभाऊ साठे युवक संघटना, एआयएमआयएम, बहुजन रयत परिषद, दलित महासंघ, कोळी महासंघ यांच्या वतीने मा. तहसीलदार पंढरपूर यांना देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मा. राज्य उपाध्यक्ष सुनिल वाघमारे, दलित स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष दिलीप देवकुळे, संभाजी ब्रिगेडचे प. महाराष्ट्र अध्यक्ष किरण घाडगे, बळीराजा शेतकरी संघटनेचे प.महाराष्ट्र अध्यक्ष माउली हळणवर, रिपाइं(आ) चे आप्पासाहेब जाधव, प. महाराष्ट्र संघटक बाळासाहेब कसबे, युवक आघाडी अध्यक्ष अॅड. कीर्तीपाल सर्वगोड, शहराध्यक्ष संतोष सर्वगोड, युवक नेते उमेश सर्वगोड, श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट, अण्णाभाऊ साठे युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा. कृष्णा वाघमारे, सल्लागार अंबादास वायदंडे, शहराध्यक्ष महेश साठे, भारिपचे मा. तालुकाध्यक्ष अॅड. सुरेश कांबळे, तालुका उपाध्यक्ष विनोद तोरणे, कोळी महासंघाचे अध्यक्ष विक्रांत माने, नगरसेवक सुजीतकुमार सर्वगोड, एआयएमआयएमचे शहराध्यक्ष जुबेर बागवान, बहुजन रयत परिषदेचे शहराध्यक्ष किशोर खिलारे, कासार समाज नेते सत्यविजय मोहोळकर, अधिवक्ता संघाचे सदस्य अॅड. अखिलेश वेळापुरे, सेवागिरी गोसावी, जेष्ठ पत्रकार श्रीकांत कसबे, पंचायत समिती सदस्य सत्यवान देवकुळे आदि उपस्थित होते.
No comments