कोरोना म्हणतोय : आतातरी वागणं सुधार माणसा, नाहीतर...
नुकताच, ब्राझील सारख्या महासत्तेच्या मार्गावर असणाऱ्या बलाढ्य देशाच्या राष्ट्रपतीना कोरोना झाला, ज्या व्यक्तीच्या सुरक्षेची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. ती व्यक्तीही संक्रमीत झाली आहे. कालच अमिताभ बच्चन व परिवाराला देखील कोरोना ची लागण झाली आहे. ही बातमीच, कोरोना महामारीचे गांभीर्य सांगण्यास पुरेशी आहे. आतापर्यंत, जगात कोट्यावधी लोकांना त्या आजाराने आपला दबदबा आणि दहशतीची जाणीव करून दिलीय. तर , लाखो लोकांचे जीव घेऊन त्यांना कायमचाच धडा शिकवलाय.दुर्दैवाने, यामध्ये, सर्वात सुरक्षित समजले जाणारे पी पी ई किट घालून कामकाज पाहणारे, हजारो डॉक्टर यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, या सर्वांच्या, मयतीला उपस्थित राहण्याचे, भाग्यही त्यांच्या नातेवाईक व मित्र मंडळी यांना लाभले नाही.
भारतात सुद्धा वीस हजारापेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि लाखो लोक संक्रमित झालेले असून, दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चाललाय. या मध्ये महाराष्ट्र राज्य तर खूपच आघाडीवर आहे. निश्चितच ही खूपच चिंतेची बाब आहे.
संपूर्ण जग हे , कोरोना महामारी रोखण्यासाठी, काय काय प्रभावी उपाययोजना करता येतील, या विषयी संशोधन करीत आहे. आपल्या देशातील व महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणा सुद्धा, सातत्याने उपाय योजना करीत आहेत. परंतु , तरीदेखील कोरोना संक्रमित रुगणांची संख्या ही दिवसागणिक, वेगाने वाढतच आहे.
भारतात, मागील सहा दिवसात, सलग वीस हजाराच्या वर रुग्ण आढळून आले आहेत. तर, आपल्या महाराष्ट्र राज्यात, दररोज पाच,सहा हजारापेक्षा जास्त रुग्णसंख्या वाढताना दिसते. ही एक प्रकारे 'खत्रे की घंटाच' म्हणावी लागेल.
थोडक्यात , सध्याच्या घडीला, ना राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, खासदार, आमदार, महापौर,नगरसेवक ई. ना महासत्ता असणारे देश, शहरे ,ग्रामीण भाग, पेठा , गल्लीबोळे ई. कोरोनाच्या तावडीतून वाचू शकली. जिकडे पाहावे तिकडे कोरोना संक्रमित रुग सापडताना दिसतायेत.
विशेष म्हणजे, या संक्रमण वाढीच्या अनेक कारणांमध्ये प्रमुख कारण म्हणजे, आपल्यातीलच काही लोकांची वागणूक आहे,असे निदर्शनास येते. हे दिड शहाणे काही लोक ,उगाचच शासनाच्या सुरक्षे संबंधित नियम, दुर्लक्षित करून, अति आत्मविश्वासात, निष्काळजीपणे बाहेर फिरताना दिसतात आणि स्वतः चा व इतरांचा जीव ही धोक्यात पाडत आहेत.
आपण लक्षात घेतले पाहिजे की, सध्याच्या घडीला, कोरोना आजारात व त्याच्या लक्षणात बदल होतोय अस संशोधन पुढे येतंय. तसेच, या महामारीवर, लस काढण्यासाठी दीडशे पेक्षा जास्त देशात, युद्ध पातळीवर चाचण्या चालू आहेत. कदाचित, येणाऱ्या पुढील काही महिन्यात लस येईलही. जी, त्यावेळी जिवंत असतील त्याच माणसांच्या उपयोगी पडेल हे ध्यानात घेतले पाहिजे.
परंतु, आपल्यातीलच काही लोक आहेत की, lockdown काढल्यापासून दिवसेंनदिवस खूपच दुर्लक्षित व निष्काळजीपणे वागताना, विनाकारण बाहेर फिरताना व थुंकताना, मास्क न लावता, चौकात/रस्त्यात गप्पा मारताना, गर्दी करताना तसेच , टाइम पास म्हणून लपून छपून पत्ते , कॅरम , क्रिकेट खेळताना मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. जणू काही, कोरोनाने त्यांच्या समोर लोटांगणच घातले आहे आणि त्यांचे कोरोना काहीच बरे वाईट करू शकणार नाही, अश्या फाजील भ्रमात आहेत.
अश्या लोकांनी, ह्या महामारीला कमी लेखून , सहज घेण्याची घोडचूक करून आपल्या व इतरांच्या जीवाशी खेळणं त्वरीत थांबवावे. त्याचबरोबर, प्रत्येकाने, जास्त घाबरून न जाता, मनाशी गाठ बांधून , महामारी संपेपर्यंत सुरक्षेसाठीच्या नियमांचे पालन करताना, कोणतीही तडजोड करू नये व सदर नियमांचे काटेकोर पालन करावे. तरच आपण सर्व या महामारीवर प्रभावी औषध उपलब्ध होईपर्यंत, सुरक्षित जीवन जगू. अन्यथा, सरते शेवटी, कोरोनालाच म्हणावे लागेल : आतातरी वागणं सुधार माणसा, नाहीतर तुला संपावयला मला वेळ लागणार नाही.
![]() |
माजी प्राचार्य, विधी महाविद्यालय,मालेगाव (नाशिक) |




Thanks sir ji
ReplyDeleteThanks sir . Ekdam barobr aahe sir .✅✅🙏🙏🙏🙏🙏
ReplyDelete