पक्षवाढीसाठी रात्रंदिवस परिश्रम घेणाऱ्या श्रीमंत संजीवराजे यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी- नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे व उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे
फलटण (प्रतिनिधी) - सातारा जिल्ह्यामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला असून, फलटण तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेत पक्षवाढीसाठी रात्रंदिवस परिश्रम घेणाऱ्या श्रीमंत संजीवराजे यांना पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करावा अशी मागणी नगराध्यक्षा सौ नीता मिलींद नेवसे , उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, राष्ट्रवादीचे गटनेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, अॅड. सौ. मधुबाला भोसले, सौ. सुवर्णा खानविलकर, सौ. प्रगती कापसे, सौ. जोत्स्ना शिरतोडे, सौ. वैशाली अहिवळे, सौ. दिपाली निंबाळकर, सौ. वैशाली चोरमले, रंजना कुंभार, सौ. मनीषा घोलप, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, अजय माळवे, सनी अहिवळे, आसिफ मेटकरी, किशोरसिंह नाईक निंबाळकर, विक्रम जाधव या नगरसेवकांच्या वतीने संयुक्तिक पत्रकाद्वारे राष्ट्रवादी चे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचेकडे करण्यात आली आहे.
![]() |
नगराध्यक्षा सौ नीता मिलींद नेवसे |
फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने श्रीमंत संजीवराजे यांना विधानसभा मतदारसंघामधून निवडून जाता आले नाही.गेली 35 वर्षे सतत समाजकारण व राजकारणात सातत्याने सक्रिय राहून अहोरात्र लोकांच्यासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती तालुक्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात आहे त्यांचा कामाचा उरक आणि तत्पर निर्णायक क्षमता संपूर्ण सातारा जिल्ह्याने अनुभवली आहे अशा सतत लोकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या या नेत्याला विधानपरिषदेवर काम करण्याची संधी मिळावी असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे
![]() |
उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे |
सलग २५ वर्षे पंचायत समिती व जिल्हा परिषदेत तालुक्यातील प्रत्येकवेळी वेगळ्या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या श्रीमंत संजीवराजे यांना विधानसभा किंवा लोकसभेवर मतदारांनी मताधिक्याने निवडून दिले असते. मात्र इतकी लोकप्रियता लाभलेल्या श्रीमंत संजीवराजे यांनी ती संधी पक्षाकडे कधी मागितली नाही,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या आदेशानुसार काम करणे, ते सोपवतील ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हीच त्यांची भूमिका आहे. कार्यकर्त्यांना श्रीमंत संजीवराजे तथा बाबा सत्तेच्या पदावर असावेत. त्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, अशी अपेक्षा असल्याने आम्ही सर्वजण श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेत काम करण्याची संधी मिळावी अशी एकमुखी मागणी करीत आहोत
पक्ष बळकटीसाठी प्रयत्नशील नेतृत्व श्रीमंत संजीवराजे यांचे कर्तृत्व व नेतृत्व सर्व जिल्ह्याला माहीती असून अशा कर्तृत्ववान नेतृत्वाला विधानपरिषदेवर कामाची संधी दिली तर सातारा जिल्ह्यात पक्षाची अजून चांगली बांधणी होईल. श्रीमंत संजीवराजे यांचे संपूर्ण सातारा जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यामध्ये विविध घटकांशी अतिशय चांगले संबंध असून या संबंधांचा फायदा सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चितच होईल यात शंका नाही सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे एक प्रभावी शस्त्र त्यांच्या हाती लागल्यावरच त्यांच्या कामाची राज्यस्तरावर नोंद होईल त्या साठी श्रीमंत संजीवराजे यांना पक्षाने संधी देणे गरजेचे असल्याचेही या संयुक्तरित्या काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे
No comments