जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणाचा निर्णय स्थानिक नेत्यांच्याच हाती!
सातारा, दि. १२ : प्रतिनिधी - सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या निवडीचे सूत्र जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांच्याच हातात असल्याचे स्पष्ट केले आहे. महायुतीने एकत्रितपणे निवडणूक लढवली असल्याने सर्व घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करूनच अध्यक्षपदाचा निर्णय घेतला जाईल. जिल्ह्यात एकमत न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे अध्यक्षपदाच्या निवडीतील स्थानिक राजकीय समीकरणांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
जावळी येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून जावळीतील स्थानिक राजकारणापर्यंत विविध विषयांवर भाष्य केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांचा झालेला विजय विरोधकांना सहन झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या विजयी मिरवणुकीत जाणीवपूर्वक गोंधळ घालून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यात आणि जिल्ह्यात महायुती म्हणून एकत्र काम करत असताना मित्रपक्षाकडून भाजपवर आरोप होणे योग्य नाही. या प्रकाराची महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाने दखल घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जावळीतील सध्याच्या राजकीय संघर्षाला अतिश कदम जबाबदार असल्याचा आरोप करत खोटे गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे राजकारण सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
बोंडारवाडी धरणाच्या प्रश्नावरून विरोधकांकडून राजकारण केले जात असल्याची टीका त्यांनी केली. धरणाच्या पुनर्वसनासाठी विरोधकांनी नेमके काय प्रयत्न केले, याचे उत्तर त्यांनी द्यावे. केवळ लोकांना एकत्र करून मोर्चे काढणे आणि मूळ प्रश्नापासून जनतेचे लक्ष विचलित करणे थांबवावे, असे आवाहन त्यांनी केले.
जावळीच्या विकासकामांमध्ये कोणी अडथळे निर्माण करण्याचा किंवा कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला प्रत्युत्तर दिले जाईल. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने विकासकामे करावीत; मात्र कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी आक्रमक भूमिका शिवेंद्रसिंहराजे यांनी मांडली.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी स्थानिक पातळीवर समन्वय साधण्याचा त्यांचा प्रयत्न आणि जावळीतील संघर्षाबाबत घेतलेली आक्रमक भूमिका, या दोन्ही विधानांमुळे जिल्ह्याच्या राजकारणात आगामी काळात महायुतीतील अंतर्गत संबंधांची कसोटी लागणार असल्याचे चित्र आहे.

No comments