Breaking News

मुधोजी महाविद्यालयात रंगणार शिवाजी विद्यापीठाचा ४६ वा मध्यवर्ती युवा महोत्सव

Shivaji University's 46th Central Youth Festival to be held at Mudhoji College

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.५ : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आयोजन फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे ६ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून फलटण नगरीत कला, संस्कृती, साहित्य, संगीत आणि सर्जनशीलतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.

    महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता मुख्य व्यासपीठावर शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू प्रा. डॉ. श्रीमती जे. पी. जाधव यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असणार आहेत. यावेळी संस्थेचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. आर. व्ही. गुरव, प्रा. डॉ. बी. एस. सातपुते, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे प्र. संचालक प्रा. डॉ. एस. जी. घाणे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात एकूण ४२ कलाप्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसंगीत वाद्यवृंद, भारतीय समूहगीत, लोककला, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सुगम गायन, शास्त्रीय गायन, नाट्यसंगीत, एकपात्री अभिनय, मूकनाट्य, नकला, पथनाट्य, वक्तृत्व, वादविवाद, प्रश्नमंजुषा, लघुपट, छायाचित्रण, रांगोळी, मेहंदी, मातीकाम, कातरकाम, व्यंगचित्र, स्थळचित्रण आणि सर्जनशील रचनाकृती अशा विविध कलाप्रकारांमधून विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सादर करता येणार आहे.

    मंगळवारी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत विद्यार्थ्यांची नोंदणी होणार असून, त्यानंतर संघ व्यवस्थापकांची बैठक आणि सादरीकरणाचा क्रम निश्चित केला जाणार आहे. दुपारी २ वाजता महाविद्यालयाच्या मैदानापासून मुख्य व्यासपीठापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर उद्घाटन समारंभ आणि लोकसंगीत वाद्यवृंदाच्या सादरीकरणाने महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रारंभ होईल.

    बुधवार, ७ ऑक्टोबर आणि गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी विविध स्पर्धा एकाच वेळी महाविद्यालयाच्या मुख्य व्यासपीठावर, प्राचार्य शिवाजीराव भोसले सभागृहात तसेच महाविद्यालयातील विविध कक्षांमध्ये पार पडणार आहेत. शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी प्रश्नमंजुषा स्पर्धेची अंतिम फेरी होणार असून, दुपारी १ वाजता विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. आर. के. कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप व पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असणार आहेत.

    युवा महोत्सव हा केवळ स्पर्धांचा उपक्रम नसून विद्यार्थ्यांच्या कलात्मक अभिव्यक्तीला, नेतृत्वगुणांना, संघभावनेला आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्यात सांस्कृतिक देवाणघेवाण, सर्जनशीलता आणि निकोप स्पर्धेची भावना वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने या महोत्सवाचे विशेष महत्त्व आहे.

    या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एल. सी. वेळेकर, प्रा. डॉ. ए. एन. शिंदे, प्रा. डॉ. टी. पी. शिंदे, श्री. आर. वाय. गायकवाड, कु. ए. एस. आडके तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.

No comments