Breaking News

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरविलेले मोबाईल शोधून काढले

Remarkable achievement by Phaltan Rural Police; 71 lost mobile phones recovered.

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३ : फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरविलेल्या मोबाईलबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तब्बल ७१ मोबाईल फोन शोधून हस्तगत केले आहेत. या मोबाईलची अंदाजे बाजारातील किंमत १२ लाख ८० हजार रुपये आहे.

    मोबाईल हरवल्याबाबतच्या सर्व तक्रारी CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या होत्या. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे संबंधित मोबाईल कोणत्या ठिकाणी व कोणत्या सिमकार्डवर वापरले जात आहेत, याची माहिती घेण्यात आली.

    तपासादरम्यान काही मोबाईल सातारा जिल्ह्याबाहेर तसेच कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये वापरले जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संबंधित मोबाईल वापरकर्त्यांशी संपर्क साधून त्यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या आणि त्यांच्याकडून मोबाईल परत मिळविले. काही मोबाईल प्रत्यक्ष ताब्यात घेण्यात आले, तर काही मोबाईल कुरिअरद्वारे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात मागविण्यात आले.

    दूरवर राहणाऱ्या तक्रारदारांना पोलीस ठाण्यात येण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी त्यांचे मोबाईल कुरिअरद्वारे पाठविण्याची सुविधाही करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२६ अखेर एकूण ७१ मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

    ही कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, तसेच फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनवळ, डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, CEIR पोर्टलचे काम पाहणारे कर्मचारी श्रीनाथ कदम, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे आणि हनुमंत दडस यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

No comments