शरयुच्या गळीत हंगामाचा उत्साहात शुभारंभ ; यंदा गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट
![]() |
| शरयु ॲग्रो इंडस्ट्रीज लि., कापशी येथील सन २०२६-२७ च्या १२ व्या गळीत हंगामाचा मोळीपूजनाने शुभारंभ करताना श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, युगेंद्रदादा पवार अविनाश भापकर व इतर मान्यवर |
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१३ - शरयु ॲग्रो इंडस्ट्रीज लि., कापशी येथील सन २०२६-२७ च्या १२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आणि पारंपरिक मोळीपूजनाने करण्यात आला. शरयु उद्योग समूहाचे चेअरमन श्रीनिवासबापू पवार, शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. शर्मिला वहिनी पवार आणि शरयु ॲग्रो इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक युगेंद्रदादा पवार यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.
यंदा गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; कारखान्याची यंत्रणा सज्ज!
यंदाच्या गळीत हंगामासाठी कारखान्याच्या विस्तारवाढीच्या माध्यमातून गाळप क्षमता दुप्पट करण्याच्या दृष्टीने आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. वाढीव गाळप क्षमतेनुसार ऊस गाळपाचे नियोजन, यंत्रसामग्रीची सज्जता आणि ऊस वाहतूक व तोडणी व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला आहे. संपूर्ण कार्यक्षेत्रात मोठ्या संख्येने ऊसतोडणी यंत्रणा दाखल झाल्याने यंदाच्या गळीत हंगामाला वेग मिळण्याची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपासाठी आणणे, ऊस वाहतुकीचे नियोजन सुरळीत ठेवणे आणि गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडणे, या दृष्टीने कारखाना प्रशासनाने आवश्यक तयारी केली आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड
शेतकरी हिताला प्राधान्य देत कारखाना व्यवस्थापनाने दसरा-दिवाळीपूर्वी ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दरात साखर वाटप करण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति टन ऊसामागे १ किलो साखर सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळणार असून, शेतकरी आणि कारखाना यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे संचालक श्री. अविनाश भापकर, युनिट हेड श्री. सुरेश पाटील यांच्यासह कारखान्याचे सर्व विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, विविध खात्यांतील अधिकारी व कर्मचारी, शेती विभागाचे कर्मचारी, ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदार, पुरवठादार आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारंपरिक मोळीपूजनाने सुरू झालेल्या या गळीत हंगामाच्या निमित्ताने शरयु ॲग्रो इंडस्ट्रीजच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढीव गाळप क्षमता, सक्षम ऊसतोडणी यंत्रणा आणि नियोजनबद्ध कामकाजाच्या बळावर यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना प्रशासन सज्ज झाले आहे.

No comments