Breaking News

फलटणकरांनो, पाणी जपून वापरा! १६ ऑक्टोबरपासून पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात

Phaltankars, use water wisely! 20 percent reduction in water supply from October 16

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१४ : अल् निनोच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार फलटण शहरातील पाणीपुरवठ्यात दैनंदिन २० टक्के कपात करण्याचा निर्णय फलटण नगरपरिषदेने घेतला आहे. शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच शहरातील सर्व स्विमिंग पूल आणि वाहन वॉशिंग सेंटर पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.

    महाराष्ट्र शासनाच्या दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पाणीपुरवठ्यात कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार फलटण शहरातील नागरिकांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दररोज २० टक्के कपात करण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेने जाहीर केले आहे.

    पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन शहरातील सर्व स्विमिंग पूल तसेच सर्व प्रकारच्या वाहनांच्या वॉशिंग सेंटर चालकांनी पुढील आदेश मिळेपर्यंत आपले व्यवसाय बंद ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

    नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखील जाधव आणि पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती राहुल निंबाळकर यांनी केले आहे.

 

No comments