श्री दत्त इंडियाच्या ८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ ; रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली साखरवाडीच्या बंद कारखान्याचे एकात्मिक औद्योगिक संकुलात रूपांतर
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१४ : बंद पडलेल्या साखर कारखान्याला पुन्हा उभारी देत एकात्मिक औद्योगिक संकुलात रूपांतरित करण्याची यशस्वी वाटचाल सुरू असलेल्या श्री दत्त इंडिया प्रा. लि., साखरवाडीच्या सन २०२६-२७ च्या आठव्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर होते. श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट, फलटण तथा अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विद्वांस शामसुंदर शास्त्री महाराज यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन व मोळी पूजन करण्यात आले. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे खातेप्रमुख, विभागप्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीमंत रामराजेंच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याला नवी उभारी
साखरवाडी येथील हा कारखाना १९३२ मध्ये ‘न्यू फलटण शुगर वर्क्स लि.’ या नावाने सुरू झाला. सातारा, फलटण, बारामती आणि सांगली परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या अर्थकारणात या कारखान्याचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. मात्र, आर्थिक नियोजनातील त्रुटी आणि व्यवस्थापनातील अडचणींमुळे कारखाना कर्जबाजारी झाला. बँकांची थकबाकी, ५४५ कायम कामगारांचे १५ ते १६ महिन्यांचे प्रलंबित वेतन आणि शेतकऱ्यांची सुमारे ४९ कोटी रुपयांची थकीत ऊसबिले यामुळे कारखान्याचा गळीत हंगाम बंद पडला. सन २०१८-१९ मध्ये गाळप होऊ शकले नाही. अखेर २० फेब्रुवारी २०१९ रोजी हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे (एनसीएलटी) गेले.
या संकटाच्या काळात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेतला. न्यायाधिकरणातील सुनावणीदरम्यान शेतकरी आणि कामगारांची देणी प्राधान्याने देण्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या प्रयत्नांमुळे कारखान्याच्या पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेला बळ मिळाले.
१५ दिवसांत पुन्हा सुरू झाली कारखान्याची धुराडी
श्री दत्त इंडिया प्रा. लि., मुंबई या अनुभवी कंपनीने एनसीएलटी प्रक्रियेद्वारे कारखान्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत कारखान्याची धुराडी पुन्हा पेटली. कामगारांना आगाऊ वेतन देण्यात आले, तर पहिल्या टप्प्यात १४ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. त्यामुळे कारखान्याच्या पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेला गती मिळाली.
सन २०२०-२१ मधील दुसऱ्या गळीत हंगामाचा प्रारंभही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाला होता. त्यावेळी साखरवाडी कारखान्याला श्रीराम कारखान्याप्रमाणे वैभव प्राप्त करून देण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्याला शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
विक्रमी गाळप आणि ऊस उत्पादकांचा वाढता विश्वास
पहिल्या हंगामात २ लाख ६० हजार मेट्रिक टन गाळपापासून सुरू झालेल्या कारखान्याने पुढील काळात प्रगतीचा टप्पा गाठला. एका हंगामात ८ लाख ६२ हजार मेट्रिक टन गाळपाचा उच्चांक नोंदविण्यात आला. सध्या कारखान्याकडे ८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील उसाची नोंदणी झाल्याची माहिती देण्यात आली.
कारखान्याकडून प्रतिटन २,७७२ ते ३,१०० रुपये दराने ऊसदर देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच पहिल्या पंधरवड्याचे १० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. वेळेवर ऊसबिले मिळत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास वाढण्यास मदत झाली आहे.
साखर कारखान्याचे एकात्मिक औद्योगिक संकुलात रूपांतर
कारखान्याच्या परिसरात अत्याधुनिक डिस्टिलरी, को-जनरेशन आणि पी.पी. बॅग निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यामुळे साखर उत्पादनाबरोबरच इतर औद्योगिक उपक्रमांनाही चालना मिळाली आहे. परिणामी, साखरवाडीचा कारखाना केवळ साखर उत्पादनापुरता मर्यादित न राहता एकात्मिक औद्योगिक संकुल म्हणून विकसित झाला आहे.
या प्रगतीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनासह श्री दत्त इंडिया समूहाचे संचालक जितेंद्र धारू, प्रिती रुपारेल, करण रुपारेल, परिक्षीत रुपारेल, चेतन धारू, उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे, प्रशासन अधिकारी अजितराव जगताप तसेच संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले.
एकेकाळी कायमचा बंद पडेल, अशी भीती व्यक्त होत असलेल्या साखरवाडी कारखान्याने पुनरुज्जीवनानंतर प्रगतीची वाट धरली आहे. आठव्या गळीत हंगामाच्या शुभारंभाच्या निमित्ताने कारखान्याच्या या प्रवासाची आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणातील त्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

No comments