जिल्हा बँकेसाठी २३६ अर्ज ; दिग्गजांच्या उमेदवारीने निवडणुकीला रंग
सातारा : प्रतिनिधी - सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली. शेवटच्या दिवशी १७० उमेदवारांनी तब्बल २३६ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. त्यामुळे बँकेच्या २१ संचालकपदांसाठी इच्छुकांची मोठी संख्या समोर आली असून, आता ५ ऑक्टोबरच्या छाननीनंतर माघारीच्या टप्प्यात राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळपासूनच निवडणूक कार्यालयात उमेदवार, सूचक, समर्थक आणि राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिंदेसेनेचे शेखर गोरे यांच्यासह विविध गटांतील प्रमुखांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
विकास सेवा सोसायटी मतदारसंघातील ११ जागांसाठी सातारा चार, जावळी आठ, महाबळेश्वर चार, कराड सात, पाटण सात, कोरेगाव सहा, खटाव नऊ, माण सहा, खंडाळा दहा, वाई पाच आणि फलटण आठ अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय महिला राखीव मतदारसंघात २८, अनुसूचित जाती १५, इतर मागास प्रवर्ग ३०, विमुक्त जाती-भटक्या जमाती २४, खरेदी-विक्री चार, अन्नप्रक्रिया पाच, नागरी सहकारी बँक २४, गृहनिर्माण व दुग्धविकास सहा आणि औद्योगिक मजूर-विणकर मतदारसंघात २६ अर्ज दाखल झाले आहेत.
अनेक मतदारसंघांत एकापेक्षा अधिक दावेदार असल्याने निवडणुकीपूर्वीच गटांतर्गत स्पर्धा उघड झाली आहे. मात्र, दाखल झालेले सर्व अर्ज प्रत्यक्ष निवडणुकीत कायम राहतीलच असे नाही. छाननीत वैध ठरणारे अर्ज आणि त्यानंतर होणारी माघार यामुळे अंतिम लढतींची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.
बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीतील नेत्यांमध्ये समन्वयाची चर्चा सुरू असल्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले असले तरी जागावाटप आणि परस्पर तडजोडीचा अंतिम निर्णय माघारीच्या टप्प्यातच होणार आहे.
दरम्यान, संचालकांच्या कार्यकाळासंदर्भातील नियामक नियमांमुळे काही प्रमुख इच्छुकांनी पर्यायी उमेदवार म्हणून कुटुंबातील सदस्यांचेही अर्ज दाखल केल्याचे चित्र आहे. त्यामुळे छाननीनंतर कोणते अर्ज कायम राहतात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच २१ संचालकपदांसाठी प्रत्यक्ष किती उमेदवार मैदानात राहतात, हे स्पष्ट होणार आहे.
अर्जांच्या संख्येतून शक्तिप्रदर्शन; माघारीत खरी कसोटी
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल करून विविध राजकीय गटांनी आपापली उपस्थिती नोंदवली आहे. विशेषतः विकास सेवा सोसायटी मतदारसंघातील अनेक जागांवर एकापेक्षा अधिक दावेदार असल्याने गटांतर्गत स्पर्धा समोर आली आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि प्रत्यक्ष निवडणूक लढणे यात मोठा फरक आहे.
महायुतीत बिनविरोध निवडणुकीसाठी समन्वयाची चर्चा सुरू असल्याने आता जागावाटपाचा ताळमेळ महत्त्वाचा ठरणार आहे. कोणत्या गटाला कोणती जागा मिळते आणि कोणत्या उमेदवाराची उमेदवारी कायम ठेवली जाते, यावर माघारीच्या टप्प्यातील राजकीय हालचाली अवलंबून राहतील. त्यामुळे सध्या दिसणारी उमेदवारांची गर्दी अंतिम लढतीचे चित्र मानता येणार नाही.
२१ जागा, २३६ अर्ज; कुटुंबातील पर्यायी चेहरेही रिंगणात
जिल्हा बँकेच्या संचालकपदांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असतानाच काही राजकीय नेत्यांनी पर्यायी उमेदवार म्हणून कुटुंबातील सदस्यांचे अर्ज दाखल केले आहेत. पत्नी, भाऊ, मुलगा अथवा अन्य नातेवाईकांच्या उमेदवारीमुळे काही मतदारसंघांत एकाच राजकीय घराण्याशी संबंधित एकापेक्षा अधिक चेहरे दिसत आहेत.
नियामक पात्रता, छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेनंतर यातील किती उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात राहतात, हे स्पष्ट होईल. त्यामुळे सध्या दाखल झालेल्या अर्जांपेक्षा छाननीनंतरची वैध उमेदवारी आणि माघारीनंतरचे संख्याबळ याला निवडणुकीच्या दृष्टीने अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

No comments