Breaking News

डॉ. राजेंद्र रुपनवर आत्महत्या प्रकरणी फलटणमध्ये तणाव; SIT चौकशीच्या मागणीसह ५ जणांविरोधात गुन्हा

Tension in Phaltan over Dr. Rajendra Rupan's suicide case; Case filed against 5 people with demand for SIT probe

    फलटण  (ॲड रोहित अहिवळे) दि.२ सप्टेंबर २०२६ : डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्या प्रकरणाने फलटणमध्ये मोठी खळबळ उडाली. या प्रकरणातील दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी करावी, या मागणीसाठी समाजबांधवांसह मोठा जमाव फलटण उपजिल्हा रुग्णालयासमोर जमला. आंदोलकांच्या मागण्या मान्य न झाल्यास उपजिल्हा रुग्णालयासमोरच अंत्यविधी करण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती.

    आज सकाळपासूनच फलटण तसेच नातेपुते-माळशिरस परिसरातून समाजबांधव उपजिल्हा रुग्णालयासमोर जमा होऊ लागले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

    आंदोलकांनी केवळ डॉ. मदने यांच्यावरच कारवाई न करता डॉ. भगवान पवार, कोंडे-देशमुख तसेच त्यांना सहाय्य करणाऱ्या इतर संबंधित व्यक्तींवरही गुन्हे दाखल करून तातडीने अटक करावी, अशी मागणी केली.

    दरम्यान, दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास डॉ. राजेंद्र रुपनवर यांचे पार्थिव मुंबईहून थेट फलटण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. पार्थिव रुग्णालयात पोहोचताच वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले. संतप्त जमावाने रुग्णालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत आंदोलकांना गेटवरच रोखले.

    यानंतर पोलीस प्रशासन आणि आंदोलकांमध्ये चर्चा सुरू झाली. तब्बल दोन तासांच्या चर्चेनंतर आंदोलकांच्या प्रमुख मागण्या मान्य करून प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

    मात्र, सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास फलटण उपजिल्हा रुग्णालयासमोर अंत्यविधीसाठी लाकडे घेऊन आलेली गाडी दिसताच पुन्हा वातावरण तापले. आंदोलकांनी रुग्णालयासमोरच अंत्यविधी करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने पुन्हा आंदोलकांशी चर्चा करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.

    अखेर प्रशासनाच्या चर्चेनंतर डॉ. राजेंद्र रुपनवर यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी फलटणहून नातेपुतेकडे रवाना करण्यात आले.

    दरम्यान, या प्रकरणात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली असून SIT चौकशीच्या मागणीमुळे प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. पुढील तपासात नेमकी कोणाची भूमिका समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments