Breaking News

कोळकीतील आयोध्या पार्कमध्ये दोन फ्लॅट फोडले; ३६ हजारांचा ऐवज लंपास

Two flats were broken into in Ayodhya Park in Kolki; Property worth Rs. 36 thousand was looted

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३० : कोळकी, फलटण येथील आयोध्या पार्क अपार्टमेंटमध्ये दोन बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी ३६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना दि. २३ ते २४ ऑगस्टदरम्यान घडली.

    याबाबत आयोध्या पार्कमधील फ्लॅट क्रमांक १ मध्ये राहणारे सुनील करणासाहेब गरदरे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गरदरे हे आयसीआयसीआय बँकेत निंभोरे येथे शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

    तक्रारीनुसार, दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ६ वाजता गरदरे हे कुटुंबासह धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांच्या मूळ गावी तिळापूर, ता. राहुरी येथे गेले होते. त्यानंतर दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारी अपार्टमेंटमधील रहिवासी विकास होले यांनी फोन करून त्यांच्या फ्लॅटचा दरवाजाचा कोयंडा उचकटलेला असून दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली.

    गरदरे यांनी फलटण येथे येऊन पाहणी केली असता घरातील कपाटातील कपडे व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटातील लॉकरचा दरवाजाही उघडा होता. लॉकरमध्ये ठेवलेली ३४ हजार रुपयांची रोख रक्कम गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

    याच अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २ मध्ये राहणाऱ्या ओमीका प्रकाश कांबळे यांच्या फ्लॅटलाही चोरट्यांनी लक्ष्य केले. ओमीका कांबळे या दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी आईच्या उपचारासाठी पुणे येथे गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी वॉचमनच्या पत्नीने फ्लॅटचा कोयंडा कापलेला असल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी फ्लॅटमध्ये जाऊन पाहणी केली.

    त्यांच्या फ्लॅटमधील साहित्यही अस्ताव्यस्त पडलेले आढळले. कपाटातील लॉकर उघडा असून त्यामधील चांदीचे पैंजणाचे एक जोड व चांदीची जोडवीचे एक जोड, असा सुमारे २ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे आढळले.

    दोन्ही फ्लॅटच्या बंद दरवाजांचे कोयंडे कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. या घटनेत एकूण ३४ हजार रुपये रोख आणि २ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, असा सुमारे ३६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

    या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

No comments