Breaking News

मुन्शी प्रेमचंद यांनी सामाजिक वास्तवाचे मानवतावादी लेखन केले - प्रा. डॉ. प्रभाकर पवार

Munshi Premchand wrote humanistically about social reality - Prof. Dr. Prabhakar Pawar

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३० :  मुन्शी प्रेमचंद हे राष्ट्रीय बाण्याचे तसेच भारतीय समाजातील वास्तव जीवनाचे प्रभावी चित्रण करणारे मानवतावादी लेखक होते. त्यांनी सामान्य माणसाच्या असामान्य जीवनसंघर्षाचे चित्रण करताना दारिद्र्य, शोषण, जातीभेद, ग्रामीण समाज, दलित, शेतकरी, शेतमजूर आणि स्त्रियांच्या प्रश्नांना आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून प्रभावीपणे मांडले. अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचे सामर्थ्य त्यांच्या साहित्याने वाचकांना दिले, असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी केले.

    मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील हिंदी भाषा विभागाच्या वतीने थोर हिंदी व उर्दू साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सविता नाईक निंबाळकर होत्या. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. नवनाथ रासकर उपस्थित होते.

    प्रा. डॉ. पवार म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीच्या राष्ट्रीय चळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना प्रेमचंदांनी भारतीय समाजातील विविध स्तरांतील जीवनाचे सूक्ष्म अवलोकन केले. उर्दू आणि हिंदी साहित्याच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे जिवंत चित्रण केले. ‘गोदान’, ‘गबन’, ‘निर्मला’, ‘कर्मभूमी’, ‘रंगभूमी’ आणि ‘सेवासदन’ यांसारख्या कादंबऱ्यांसह त्यांनी २०० हून अधिक कथा लिहिल्या.

    साधी, सहज आणि लोकाभिमुख भाषा वापरून त्यांनी शेतकरी, गरीब, दलित आणि स्त्री जीवनातील समस्या साहित्यात मांडल्या. सामाजिक विषमता, दारिद्र्य, शोषण, अन्याय, वंचितता आणि उपेक्षिततेवर कठोर प्रहार करत त्यांनी मानवतावादी मूल्यांचा पुरस्कार केला. राष्ट्रीय एकात्मतेला सर्वोच्च स्थान देतानाच स्त्रियांची सामाजिक स्थिती, त्यांचा संघर्ष तसेच दलित-वंचित समाजाच्या प्रश्नांचे प्रभावी चित्रण प्रेमचंदांनी केले, असे त्यांनी सांगितले.

    आजच्या तरुण पिढीने आणि लेखकांनी प्रेमचंदांच्या साहित्याचा आदर्श व प्रेरणा घेऊन देशासमोरील वर्तमान प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे, असे आवाहनही प्रा. डॉ. पवार यांनी केले.

    अध्यक्षीय भाषणात डॉ. सविता नाईक निंबाळकर म्हणाल्या की, देशभक्ती आणि लोककल्याणाच्या भावनेने प्रेरित होऊन लेखन करणारे प्रेमचंद यांच्यासारखे लेखक फार कमी आहेत. भारतीय समाजाचे वास्तव आणि स्त्री जीवनाची मूलभूत जाण त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडली. मानवी मूल्ये आणि साहित्य मूल्यांची सांगड घालत त्यांनी समाजपरिवर्तनाला चालना देणारे लेखन केले. विद्यार्थ्यांनी प्रेमचंदांचे साहित्य आवर्जून वाचावे, असे आवाहन त्यांनी केले.

    महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पंढरीनाथ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किरण सोनवलकर यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी प्रा. किरण सोनवलकर यांनी आभार मानले.

No comments