फलटण तालुक्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्याची संधी; इच्छुकांकडून १८ ऑगस्टपर्यंत अर्ज मागविले
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.७ - महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार फलटण तालुक्यात नवीन 'आपले सरकार सेवा केंद्र' वितरित करण्यासाठी इच्छुक व्यक्ती व महाविद्यालयांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १८ ऑगस्ट २०२६ असून, पात्र उमेदवारांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, फलटण येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या १९ जानेवारी २०१८ व २० ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयानुसार तसेच इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या ९ जुलै २०२६ रोजीच्या शुद्धिपत्रकानुसार ‘आपले सरकार सेवा केंद्र’ वितरण प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारित निकषांमध्ये गुणांकनावर आधारित निवड प्रक्रिया, किमान पात्रता, आवश्यक पायाभूत सुविधा, मुलाखत, कार्यप्रदर्शनावर आधारित कराराचे नूतनीकरण तसेच अपात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकारी यांनी ३१ जुलै २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपरिषदनिहाय रिक्त जागांची यादी, अर्जाचा नमुना तसेच अटी व शर्ती सातारा जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा, उपविभागीय अधिकारी कार्यालय फलटण आणि तहसील कार्यालय फलटण येथील सूचना फलकावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
इच्छुक व पात्र व्यक्ती तसेच महाविद्यालयांनी अर्ज अचूक व परिपूर्ण भरून १८ ऑगस्ट २०२६ पर्यंत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत (शासकीय सुट्ट्या वगळून) उपविभागीय अधिकारी कार्यालय, फलटण येथे सादर करावेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

No comments