Breaking News

मुधोजी हायस्कूलमध्ये 'एक राखी सैनिकांसाठी' उपक्रम उत्साहात; आजी-माजी सैनिकांचा सन्मान

'One Rakhi for Soldiers' initiative in full swing at Mudhoji High School; Honoring veterans and former soldiers

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २८ ऑगस्ट : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये रक्षाबंधनाचे औचित्य साधून 'एक राखी सैनिकांसाठी' हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या वतीने पत्राद्वारे निमंत्रित करण्यात आलेल्या १५ आजी-माजी सैनिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

    उपस्थित प्रमुख अतिथींचे स्वागत स्वागतगीताने व गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय गोफणे व तृप्ती शिंदे यांनी केले, तर पर्यवेक्षक आर. बी. निंबाळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्राचार्य वसंतराव शेडगे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

    यावेळी बोलताना प्राचार्य वसंतराव शेडगे म्हणाले की, देशातील नागरिक सैनिकांच्या देशप्रेम आणि निष्ठेमुळेच मुक्तपणे श्वास घेत आहेत. सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना विद्यालयात निमंत्रित करून औक्षण करणे, राखी बांधणे आणि सीमेवरील सैनिकांना राख्या पाठवणे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे.

    ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य सोमनाथ माने यांनी देशसेवेसारखे दुसरे महान कार्य नसून विद्यार्थ्यांनी याकडे एक उत्तम संधी म्हणून पाहावे, असे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान एअर फोर्स सार्जंट ज्ञानदेव नाळे आणि हवालदार बाळासो घाडगे यांनी शैक्षणिक जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले.

    कला शिक्षक बापूराव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या उपस्थित सैनिक बांधवांना औक्षण करून बांधल्या. या राख्या सीमेवरील सैनिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी 'शिवभक्त परिवार महाराष्ट्र राज्य'चे वैभव गोडसे यांनी घेतली.

    या कार्यक्रमास हवालदार महादेव शेलार, नायक बाळासाहेब गौंड, हवालदार अनिल शिंदे, गणपतराव निंबाळकर, रामचंद्र रिटे, हवालदार वाल्मिक पवार, हवालदार उमेश करवर आणि पर्यवेक्षक आर बी निंबाळकर व विजय पाटील यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन बापूराव सूर्यवंशी, सौ  वनिता लोणकर , प्रीतम लोंढे यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक विजय पाटील यांनी मानले.

No comments