Breaking News

मुधोजी महाविद्यालयात Income Tax & GST Course आणि SAP FICO अभ्यासक्रमांचा शुभारंभ

Income Tax, GST, SAP FICO courses launched at Mudhoji College

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. २४ ऑगस्ट २०२६ :  फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयातील वाणिज्य विभाग व Skill Development Cell यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या Income Tax & GST Course आणि SAP FICO Course यांचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना अद्ययावत सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष Hands-on Training मिळावे आणि त्यांची रोजगारक्षमता वाढावी, या उद्देशाने हे दोन्ही अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

    वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. जे. पी. बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन्ही रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत.  Income Tax (आयकर), GST (जीएसटी) आणि SAP FICO (एसएपी फिको) यांसारख्या उद्योगविश्वात महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्रांचे व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने त्यांच्या कौशल्यविकासाला मोठी चालना मिळणार आहे.

    या उपक्रमाला संस्थात्मक स्वरूप देताना Suraksha NextGen Skills, Pune आणि मुधोजी महाविद्यालय यांच्यात Memorandum of Understanding (MOU) करण्यात आला. या सामंजस्य करारावर Suraksha NextGen Skills, Pune येथील प्रमुख श्रीमती स्नेहा पंडित आणि मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या MOU मुळे विद्यार्थ्यांना संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण, मार्गदर्शन तसेच प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव मिळण्याचा मार्ग अधिक व्यापक झाला आहे.

    या अभ्यासक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी श्रीमती स्नेहा पंडित, श्री. प्रशांत गिजारे, श्री. अक्षय लाड आणि श्री. विक्रम पंडित हे तज्ज्ञ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी बदलत्या रोजगारविश्वाच्या गरजा लक्षात घेऊन तांत्रिक व व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ललित वेळेकर यांनी केले. श्रीमती स्नेहा पंडित आणि श्री. प्रशांत गिजारे यांनी विद्यार्थ्यांना मनोगताद्वारे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रात आवश्यक असणारी कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले.

    अध्यक्षीय मनोगतात प्रो. डॉ. पी. एच. कदम, प्राचार्य, मुधोजी महाविद्यालय, फलटण यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षणाची आवश्यकता अधोरेखित केली. बदलत्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्राच्या गरजांशी विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले जाईल, असे त्यांनी नमूद केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमृता गायकवाड यांनी केले, तर डॉ. एस. जी. निकम यांनी आभार मानले. यावेळी वाणिज्य विभागातील प्राध्यापिका स्वाती सावंत उपस्थित होत्या.

    विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच उद्योगाभिमुख कौशल्ये, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देणारा हा उपक्रम मुधोजी महाविद्यालयाच्या कौशल्याधारित शिक्षणाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

No comments