Breaking News

जनगणनेच्या पार्श्वभूमीवर प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण दि.5 ते 7 दरम्यान

Training of enumerators and supervisors in the context of the census from 5th to 7th

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ मे २०२६ - केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १६ व्या जनगणनेच्या प्रक्रियेला दि.१ मे पासून सुरुवात झाली आहे.त्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषद हद्दीतील सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण उद्या दि.5 ते 7 या दरम्यान होत आहे.

    सद्यस्थितीत 42 अंश सेल्सिअस एवढे तापमान असल्याने फलटण शहरातील शिक्षक संघटनांनी है जनगणना प्रशिक्षण सकाळ सत्रात घ्यावे अशी मागणीही केली होती. मात्र फलटण नगरपरिषद प्रशासनाने हे प्रशिक्षण सकाळ सत्रात घेण्याऐवजी दुपार सत्रात घेण्याचा घाट येथील घातला आहे.

    फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे तीन टप्यातील जनगणना प्रशिक्षण सकाळ सत्रात झाले असताना फलटण शहरातील जनगणना प्रशिक्षणा बाबत दुजाभाव का?,तसेच एखादया शिक्षकास उष्माघाताने दगाफटका झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल शहरातील शिक्षक संघटनांनी केला आहे.

    फलटण शहरातील सर्व १३ प्रभागांमध्ये या कामासाठी ९२ प्रगणक व १८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.या सर्वांना उदया दिनांक 5 ते 7 मे दरम्यान सकाळी 9:30 ते 5:30 या वेळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

    मात्र सद्यस्थितीत 42 अंश सेल्सिअस एवढे तापमान आहे.उकाडयाने नागरीक हैराण झाले आहेत.गेल्या महिन्यात पिंपळगाव रोठा ता.पारनेर जि.अहिल्यानगर येथील शिक्षिकेचा उष्माघाताने मृत्यु झाल्याची ताजी घटना असतानाही फलटण नगरपरिषद प्रशासनाने उदयापासून होणारे प्रशिक्षण सकाळ सत्रात घेण्याऐवजी सकाळी 9:30 ते 5:30 या वेळेत दिवसभर घेण्याचा घाट घातल्याने सर्व शिक्षक प्रगणक आणि पर्यवेक्षक यांच्यामध्ये नाराजीचे वातावरण आहे.

    ऐन कडक ऊन्हाचा विचार न करता येथील नगर परिषद प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेतली नाही.त्यामुळे सदर प्रशिक्षणाच्या वेळेबाबत माहितीचे पत्र तातडीने जिल्हाधिकारी यांना ईमेलव्दारे कळवणार असल्याचे फलटण शहर संघटनेचे प्रतिनिधी यांनी सांगितले.

No comments