भगव्या सप्ताहात तालुक्यात शिवसेनेच्या 100 शाखा सुरू करणार - चंद्रहार पाटील
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ मे २०२६ - मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे काम सुरू होत असून, या अंतर्गत पक्षातर्फे बूथ लेव्हल एजंट नेमण्याची जबाबदारी माढा लोकसभा मतदारसंघात पूर्ण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या प्रक्रियेत माढा लोकसभा मतदारसंघ सध्या आघाडीवर असल्याची माहिती देतानाच फलटण तालुक्यात १०० नवीन शिवसेना शाखा सुरू करणार असल्याचे शिवसेना माढा लोकसभा संपर्कप्रमुख पै. चंद्रहार पाटील यांनी सांगितले.
फलटण येथे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. पत्रकार परिषदेप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवसेना नेते पै. संतोष (आबा) वेताळ, फलटण पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, नानासो इवरे, विराज खराडे यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
येत्या ११ ते १७ मे या कालावधीत फलटण विधानसभा मतदारसंघात 'भगवा सप्ताह' राबवण्यात येणार असून, यादरम्यान १०० नवीन शिवसेना शाखा सुरू करण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची बांधणी अत्यंत वेगाने केली जात आहे. "येत्या काळात सातारा जिल्ह्यात ५ ते ६ आमदार आणि इथले दोन्ही खासदार शिवसेनेचे झाले पाहिजेत," हा विचार घेऊन पक्षाचे संघटन मजबूत करत असल्याचे पै. चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यामुळे शिवसेनेला या भागात 'दहा हत्तींचे बळ' मिळालेले आहे, असे उद्गार चंद्रहार पाटील यांनी काढले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवसेना पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी गावोगावी, वॉर्डावॉर्डात आणि वस्तीवस्तीवर शाखा सुरू करण्याचे धोरण आम्ही निश्चित केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ११ मे ते १७ मे या कालावधीत फलटण तालुक्यात १०० नवीन शाखा सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही कामाला लागलो आहोत, असा विश्वास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मतदान याद्यांच्या अद्यावतीकरणाचे काम सध्या सुरू असून, शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक ठिकाणी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने पक्षातर्फे 'बी.एल.ए.' (बूथ लेव्हल एजंट) नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. फलटण-कोरेगाव मतदारसंघासाठी विराज खराडे यांची 'बी.एल.ए. १' (BLA-1) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, पुढील नियुक्त्यांचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. पात्र मतदार यादीत समाविष्ट राहतील, याची खबरदारी शिवसेनेकडून घेतली जाईल, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.
.jpg)
No comments