Breaking News

सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान

Mrs. Vaishali Chormale honored with the district level Punyashloka Ahilyadevi Holkar Award from the state government

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ मे २०२६ -  महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन २०२१-२२ सौ. वैशाली कृष्णाथ चोरमले यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या शुभहस्ते वितरण करण्यात आला.

    या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकड, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, तसेच उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    सौ. वैशाली चोरमले यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महिला व बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. विशेषतः जागतिक महिला दिन निमित्त त्यांनी विविध उपक्रम राबवून महिलांमध्ये जनजागृती घडवून आणली आहे. महिलांच्या आरोग्यासाठी सर्व रोग निदान शिबिरे, आरोग्यविषयक व्याख्याने, तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करून त्यांनी महिलांना सशक्त करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे.

    गौरी सजावट स्पर्धेसारख्या उपक्रमांमधून महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आकर्षक बक्षिसांच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन दिले जाते.

    बालकल्याण क्षेत्रातही त्यांचे कार्य तितकेच मोलाचे आहे. महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गेल्या २० वर्षांपासून दिव्यांग मुलांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. 

    दिव्यांग मुलांचा शोध घेणे, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, तसेच शैक्षणिक व व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करणे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. याशिवाय, या मुलांना आवश्यक शैक्षणिक साहित्य व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

    विशेष म्हणजे, गेल्या १५ वर्षांपासून कोणतेही शासकीय अनुदान न घेता त्यांनी सुमारे ४० मूकबधिर मुलांसाठी वसतिगृहाची उत्तम व्यवस्था केली आहे. या वसतिगृहामध्ये मुलांना निवास, शिक्षण व आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

    महिला व बालकल्याण क्षेत्रातील या सर्वसमावेशक व निस्वार्थ कार्याची दखल घेत सौ. वैशाली चोरमले यांना महिला क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे समाजातील दुर्बल घटकांना नवी दिशा मिळत असून, त्यांच्या या योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments