Breaking News

नीरा - देवघर प्रकल्पाचा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश आणि फलटण - पंढरपूर रेल्वे मार्गाची उभारणी यासाठी खा. मोहिते पाटील प्रयत्नशील

Minister Mohite Patil is working hard to include Neera-Deoghar project in the Prime Minister's Agriculture Irrigation Scheme and to construct Phaltan-Pandharpur railway line

        फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. ४ : नीरा - देवघर प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून निधी उपलब्ध होण्यासाठी आणि फलटण - पंढरपूर रेल्वे मार्गाला मान्यता मिळून सदर मार्ग लवकर पूर्ण व्हावा या २ मागण्यांसाठी माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होत असून केंद्र शासन त्याबाबत आवश्यक तरतुदी करेल असे आश्वासन त्यांना लेखी उत्तरात देण्यात आले आहे.

    नीरा - देवघर प्रकल्पास सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची (PIB)  मान्यता, प्रकल्पाचे यशस्वी मूल्यांकन आणि पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेशासाठी शिफारस प्राप्त झाल्यानंतर सदर प्रकल्पाचा समावेश पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत करण्याचे आश्वासन माढा लोकसभा मतदार संघाचे खा. धैर्यशील मोहिते पाटील यांना गुरुवार दि. २ एप्रिल रोजी लोकसभेत देण्यात आले आहे.

    केंद्र सरकारच्या या उत्तरामुळे नीरा - देवघर सिंचन प्रकल्पाचा समावेश पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत करण्याचे प्रकरण अद्याप प्रलंबीत असल्याचे स्पष्ट झाले असून, माढा लोकसभा मतदार संघातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सिंचन सुविधेसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

    खा. मोहिते पाटील यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांमध्ये महाराष्ट्रातील नीरा - देवघर सिंचन प्रकल्पास आर्थिक मान्यता देण्यासाठी सार्वजनिक गुंतवणूक मंडळाकडे (PIB) प्रस्ताव सादर करण्यात आला होता काय ? तसेच या प्रस्तावाच्या परीक्षणासाठी PIB ची बैठक निश्चित करण्यात आली होती काय ? असल्यास, त्याचा तपशील काय आहे आणि संबंधीत मंत्रालयाच्या विनंतीवरुन ही बैठक पुढे ढकलण्याची कारणे काय होती ? सदर PIB बैठकीसाठी नवीन तारीख निश्चित करण्यात आली आहे काय ? तसेच या संदर्भात कोणताही पाठपुरावा प्रस्ताव  सादर करण्यात आला आहे काय ?

    विशेषतः माढा लोकसभा मतदार संघातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर सिंचन सुविधा मिळाव्यात यासाठी नीरा - देवघर सिंचन प्रकल्पास मान्यता मिळवून देण्याकरिता मंत्रालयाकडून कोणती ठोस पावले उचलण्यात येत आहेत ?

    नीरा - देवघर सिंचन प्रकल्पाच्या आर्थिक मंजुरीसाठीचा प्रस्ताव सार्वजनिक गुंतवणूक मंडळाकडे (PIB) सादर करण्यात आला होता आणि या प्रकल्पाचे मूल्यांकन करण्यासाठी दि. ७ जून २०२४ रोजी बोलाविण्यात आलेली या मंडळाची बैठक स्थगित करण्यात आली असून सदर मंडळाच्या पुढील बैठकीची तारीख अद्याप निश्चित करण्यात आली नाही, तथापि सदर मंडळाच्या बैठकीत प्रकल्पाचे मूल्यांकन आणि योजनेत समावेश करण्याची शिफारस प्राप्त झाल्यानंतर सदर योजनेचा समावेश पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी लोकसभेत दिले आहे. 

    दरम्यान फलटण - पंढरपूर रेल्वे मार्ग फार पूर्वी मंजूर झाला होता व त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे रेल्वे कडे हस्तांतरण देखील झाल्याचे निदर्शनास आणून देत सदर रेल्वे मार्गाच्या सद्यस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी सदर मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे, राज्य सरकार, निती आयोग आणि वित्त विभागाकडून मूल्यांकन करुन घेणे व मंजुरी मिळणे आवश्यक असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे लेखी उत्तरात कळविले आहे.

    खा. धैर्यशील मोहिते पाटील नीरा - देवघर प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी प्रामुख्याने कालव्याच्या कामाची पूर्तता आणि फलटण - पंढरपूर रेल्वे मार्गाची तातडीने उभारणी यासाठी प्रयत्नशील असून लोकसभेच्या माध्यमातून आणि व्यक्तिशः संबंधीत मंत्रालय पातळीवर प्रयत्नशील असल्याने सदर दोन्ही प्रकल्प मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त होत आहे.

No comments