Breaking News

फलटण बाजार समितीत हरभरा-तूर हमीभाव खरेदी सुरू

Guaranteed price purchase of gram and tur has started in Phaltan Market Committee

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. ९: कृषि उत्पन्न बाजार समिती फलटणच्या मुख्य बाजार आवारात नाफेड व फलटण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ यांच्या माध्यमातून हरभरा व तूर या शेतमालाची हमीभावाने खरेदी सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेअंतर्गत हरभऱ्यास प्रति क्विंटल ५,८७५ रुपये तर तुरीस ८,००० रुपये हमीभाव दिला जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

    नाफेडमार्फत सन २०२५-२६ हंगामासाठी हरभरा व तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. तूर खरेदीसाठी २४ मार्च २०२६ पर्यंत तर हरभरा खरेदीसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत नोंदणीची मुदत देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन बाजार समितीचे व्हा. चेअरमन भगवानराव होळकर यांनी केले आहे.

    बाजारात हरभरा व तुरीचे दर घसरल्यामुळे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, यासाठी सब-एजंट म्हणून फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खरेदीसाठी शेतमालातील कमाल आर्द्रता १२ टक्के असणे आवश्यक आहे.

    सन २०२५-२६ हंगामात ७/१२ उताऱ्यावर संबंधित पिकाची नोंद असणे बंधनकारक असून, नोंदणीसाठी आधार कार्ड झेरॉक्स, डिजिटल किंवा स्वाक्षरीतील ७/१२ उतारा, खाते उतारा, बँक खात्याची प्रत आदी कागदपत्रांसह मुख्य कार्यालय, मार्केट यार्ड, फलटण येथे नोंदणी करावी लागणार आहे.

    ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे शेतमाल आणण्याची तारीख कळविण्यात येईल आणि त्याच दिवशी खरेदी केंद्रावर माल आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी केले.

    हमीभाव खरेदी संदर्भात अधिक माहितीसाठी फलटण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक विठ्ठल जाधव (मो. ७९७२४१७५४६) तसेच समितीचे ग्रेडर के. पी. सस्ते (मो. ९८९०४५६८२४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments