Breaking News

श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती

Awareness campaign on cervical cancer and HPV vaccination at Shri Jitoba Vidyalaya Jinti

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.28 -  विद्यार्थ्यांचा आरोग्याचा दर्जा सुधारावा, भविष्यात येणाऱ्या समस्यांना सहजतेने सामोरे जाता यावे व कर्करोगासारख्या  भयंकर आजारापासून वाचावे, यासाठी रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा उप रुग्णालय  फलटण येथील डॉ एन.पी. तेली, ज्येष्ठ शिक्षक व समुपदेशक ताराचंद्र आवळे, सौ जमदाडे व्ही.एस. नर्स सकाटे जे.ए. आरोग्य विभाग प्रमुख हन्नुरे एस.एम.  यांची प्रमुख उपस्थिती होती.

    डॉ तेली एन.पी. म्हणाले की आरोग्य विभागामार्फत सध्या गर्भाशय मुखाचा कर्करोग व एच पी व्ही लसीकरण जनजागृती सुरू असून ज्या विद्यार्थिनी या लसीकरणास पात्र आहेत त्यांनी ही लस साखरवाडी आरोग्य केंद्र येथे जाऊन घ्यावी. सध्या ही लस मोफत दिली जाते त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा. ही लस ऐच्छिक असून आपल्या पालकांच्या सल्ल्याने घ्यावी.

    समुपदेशक ताराचंद्र आवळे म्हणाले की, शासनाचे व संस्थेचे विविध उपक्रम आपण शालेय स्तरावरती राबवत असतो. शाळा हे संस्काराचे प्रमुख साधन आहे त्यामुळे ज्या चांगल्या बाबी आहेत त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचाव्यात व त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, मानसिक,आरोग्य दर्जा व गुणवत्ता सुधारावी यासाठी सतत प्रयत्न केले जातात. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत विविध योजना राबवल्या जातात त्यापैकी गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती मोहीम या विद्यालयात राबवली जात आहे. जनजागृतीच्या माध्यमातून पालक, विद्यार्थी यांच्या शंकांचे निरसन व्हावे व त्यातून भावी पिढी सुदृढ निरोगी व भयंकर आजारापासून दूर राहावी हीच अपेक्षा आहे. कर्करोग कोणताही स्वरूपाचा असला तरी तो महाभयंकर आहे त्यापासून वाचणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांच्याकडून ज्या वयात चुका होतात त्यात चुका सुधाराव्यात तसेच भविष्यात गर्भाशयाचा कर्करोग होऊ नये त्याचा प्रतिबंधक उपाय म्हणून ही लस मोफत दिली जात आहे. एचपी व्ही लसीकरण हे ऐच्छिक आहे त्यामुळे आपण आपल्या पालकांशी सुसंवाद साधावा व त्यानंतर निर्णय घ्यावा. याबाबत कोणालाही सक्ती केली जाणार नाही. समाज माध्यमावर याबाबत विविध शंका, कुशंका व चांगल्या बाबीही पहावयास मिळतात त्यामुळे या सगळ्या बाबींचा आपण विचार करावा. जे चांगले आहे त्याचा स्वीकार करावा व आपले आरोग्य सुधारावे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक सोळंकी ए. आर.यांनी केले तर आभार उपशिक्षिका सौ सोनवलकर ए.ए. यांनी मानले. यावेळी सातवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.

No comments