नियमभंग करणाऱ्या फलटण तालुक्यातील साखर कारखान्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी - स्वाभिमानी शेतकरी संघटना
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ - फलटण तालुक्यातील साखर कारखान्यांकडून जाणीवपूर्वक नियमभंग होत असून, साखर आयुक्तांनी फलटण तालुक्यातील संबंधित साखर कारखान्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी निवेदन देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. प्रसंगी जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र घाडगे, तालुका अध्यक्ष नितीन यादव, प्रमोद गाडे, किरण भोसले, दादा जाधव उपस्थित होते.
साखर आयुक्त पुणे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सातारा जिल्ह्याच्या वतीने आपणांस अत्यंत तीव्र शब्दांत हे निवेदन सादर करीत आहोत. सातारा जिल्ह्यात एकूण १७ सहकारी व खासगी साखर कारखाने कार्यरत असून, दुर्दैवाने यापैकी एकाही कारखान्याने साखर आयुक्त कार्यालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केलेले नाही. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांवर होणारा उघड अन्याय आहे.
यामध्ये फलटण तालुक्यातील स्वराज ॲग्रो शुगर उपवळे साखर कारखाना हा नियमभंगात आघाडीवर असून, गेली साठ दिवस हा कारखाना बेकायदेशीरपणे चालू आहे. तरीसुद्धा आजपर्यंत एफ.आर.पी. बिल अदा केलेले नाही, ऊस दर जाहीर केलेला नाही, साखर आयुक्त कार्यालयाचे कोणतेही आदेश व नियम पाळलेले नाहीत, शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक उघडपणे सुरू आहे.
हा प्रकार म्हणजे साखर आयुक्त कार्यालयाच्या अधिकारांना थेट आव्हान देण्यासारखा असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कारखानदारांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे.
तरी आपणांस स्पष्ट शब्दांत मागणी करतो की या कारखान्याने ऊस नियंत्रन कायदा 1966चे उल्लंघन केली आहे तरी या कारखान्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच गाळप परवाना रद्द करावा शेतकऱ्याची सर्व थकीत एफ आर पी सह ऊस बिले व्याजासह त्वरित मिळावी तसेच स्वराज ॲग्रो शुगर साखर कारखान्यावर तात्काळ प्रशासकीय नियंत्रण (अत्यावश्यक प्रशासकीय कारवाई) लागू करावी. थकीत एफ.आर.पी. रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. ऊस दर तात्काळ जाहीर करण्याचे आदेश द्यावेत. नियमभंग करणाऱ्या सर्व साखर कारखान्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी.
जर या मागण्यांकडे तात्काळ लक्ष दिले नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा आपल्या दालनात बेमुदत मुक्काम आंदोलन करण्यात येईल व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी आपणावर राहील, याची स्पष्ट नोंद घ्यावी. याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील.
असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा यांच्या वतीने देण्यात आले आहे.

No comments