शासन आपल्या दारी’ फलटणमध्ये फक्त प्रसिद्धीसाठी?
फलटण गंधवार्ता वृतसेवा दि.११ - फलटणच्या तहसील कार्यालय आवारात युवकांपासून वृद्धांपर्यंत सर्व छोट्या-मोठ्या कामासाठी थांबले असून शासकीय कार्यालयात अधिकारी नसल्यामुळे हा खोळंबा झालेला आहे, शासकीय अधिकाऱ्यांनी कार्यालयात थांबून यांची कामे करायची, का गावागावात जाऊन, अधिकारी व वायरमन अंगणवाडी सेविका यांना तिथे बोलवून गैरसोय निर्माण करायची, हा कुठला शासन आपल्या दारी कार्यक्रम? हा तर फक्त प्रसिद्धीसाठी राबवण्यात आलेला कार्यक्रम असल्याची टीका शिवसेना शिंदे गट पक्षाचे तालुकाध्यक्ष नानासो इवरे यांनी केली.
आमदार सचिन पाटील यांच्या शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्यावतीने तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयात जाऊन या उपक्रमाचा जीआर आहे का ? अशी विचारणा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली असता त्यांना जीआर मिळाला नाही, तसेच अधिकारी नसल्यामुळे जनतेची कामे थांबल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर, नानासो इवरे व पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. याप्रसंगी शिवसेनेचे शहराध्यक्ष निलेश तेलखडे, ज्ञानेश्वर पवार, अक्षय गायकवाड, संग्राम अहिवळे, अभिजीत जानकर, संतोष बिचुकले, राहुलदादा पवार, मंगेश आवळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
फलटण मध्ये फक्त प्रसिद्धीसाठी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे, पुढार्यांच्या समवेत अधिकाऱ्यांना घेऊन फिरायचे, अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा मागे मागे फिरवायचा व व इकडे तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयात सर्वसामान्य माणसांची कामे खोळंबून ठेवायची अशी जर चुकीची पद्धती असेल तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल तसेच अधिकारी जर वेळेत शासकीय कार्यालयात हजर नसतील तर शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्यात येईल असा इशारा तालुकाध्यक्ष नानासो इवरे यांनी दिला.
नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही फलटणच्या तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयात येऊन पाहिले असता, येथे नागरिकांची कामे होत नसल्याचे निदर्शनास आले, अधिकारी, शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी बाहेरगावी गेल्याचे दिसून आले असल्याचे सांगतानाच, सध्या आमदार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करत आहेत आणि प्रांताअधिकारीही आमदारांच्या समवेत आहेत, आमदार शासकीय यंत्रणा स्वतःच्या प्रचारासाठी राबवत असल्याचा आरोप शहराध्यक्ष निलेश तेलखडे यांनी केला.

No comments