दूध प्या ; दारू व गुटख्यासारख्या व्यसनांपासून दूर राहा – अंनिसचे नागरिकांना आवाहन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ - समाजामध्ये व्यसनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत होते. विशेषतः नवीन वर्षाच्या सुरुवातीला तरुण वर्ग पार्टीच्या नावाखाली दारू, गुटखा यांसारख्या व्यसनांकडे वळत असल्याची बाब चिंताजनक असल्याचे जाणवत होते. या पार्श्वभूमीवर समाजामध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) व समविचारी मूलभूत अधिकार संघर्ष समिती यांच्या वतीने फलटण येथील महात्मा फुले चौकात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली होती. या उपक्रमाला नागरिकांसह तरुण वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी “नवीन वर्षाच्या सुरुवातीला दूध प्या, पण दारू व गुटख्यासारखी व्यसने करू नका”, “व्यसनापासून दूर रहा आणि आपले जीवन सुंदर बनवा” अशा जोरदार घोषणा दिल्या होत्या. या घोषणांमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले गेले होते.
महात्मा फुले चौकात नागरिक व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अंनिस व समविचारी मूलभूत अधिकार संघर्ष समिती यांच्या वतीने नागरिकांना दूध वाटप करण्यात आले होते. अनेक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत, नवीन वर्षाची सुरुवात अशा सकारात्मक संदेशाने झाल्याची भावना व्यक्त केली होती.
या कार्यक्रमास आनंद देशमुख (माजी डीवायएसपी), प्रशांत भुजबळ (माजी इन्कम टॅक्स अधिकारी), डॉ. दीपक शेंडगे, मंदाकिनी गायकवाड, अयान अत्तार, ज्योतीराम बोराटे, मोहिनी कुलकर्णी, आरती काकडे, जयवंत काकडे, पत्रकार बाळकृष्ण भगत, हनुमंत शिंदे, निलेश अहिवळे, प्रसाद शेंडगे, वसीम शेख, सुनील जाधव, बनसोडे सर, सोमनाथ नाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता.

No comments