महिलांनी अन्नप्रक्रिया उद्योग उभे करून स्वयंपूर्ण व्हावे- मुख्याधिकारी निखिल मोरे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ ऑगस्ट२०२५ - महिलांनी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे अन्नप्रक्रिया उद्योग उभारावेत व स्वयंपूर्ण व्हावे. बीज भांडवल योजनेमधून सुद्धा छोटे उद्योग उभारू शकतात असे मुख्याधिकारी निखील मोरे यांनी संबोधित केले.
पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत ज्या बचत गटातील महिलांना बीज भांडवल प्राप्त झाले आहे, अशा महिलांकरिता एक दिवसाचे प्रशिक्षण आत्मनिर्भर शहर स्तर संघ , फलटण नगरपरिषद फलटण येथे आयोजित केले होते. या कार्यशाळेमध्ये जिल्हास्तरीय मुख्य प्रशिक्षक श्री लीनेश निकम यांनी विविध लघुउद्योगांची माहिती सांगितली, शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली, उत्पादनाचे पॅकेजिंग कसे असावे, त्याचे मार्केटिंग कशाप्रकारे करावे , अन्नसुरक्षा मनाचे व त्याचे महत्त्व या सर्व विषयांवर चित्रफितींद्वारे मार्गदर्शन केले. या योजनेमधून ज्या महिलांना लोन व सबसिडी मिळाली आहे व ज्यांचे उद्योग यशस्वीरित्या उभे आहेत अशा उद्योजिका महिलांचे सुद्धा मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामधून महिलांना प्रेरणा मिळवून त्या उद्योग उभारणीस प्रवृत्त होतात. सर्व विषय महिलांनी समजून घेऊन त्यावर प्रश्नोत्तरे सुद्धा झाली व भविष्यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग उभा करण्याचा निर्धार केला. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी एकूण 50 महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमांमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा याच्या फलटण विभाग प्रमुख सौ संजना आटोळे यांनी सुद्धा उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. उमेद विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. विभाग प्रमुख सौ. मनाली शेटे यांनी सुद्धा उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरिता श्री शिंदे, श्री शिरतोडे, शहर अभियान व्यवस्थापक व सौ विद्या रिठे, व्यवस्थापक यांनी विशेष प्रयत्न केले. सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments