Breaking News

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र भागवत यांचे अपघाती निधन

Senior journalist Rajendra Bhagwat dies in accident

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० - फलटण तालुका ग्रामीण संघाचे संस्थापक उपाध्यक्ष, दैनिक ऐक्य सातारा गोखळी ता. फलटण येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दिनकर भागवत (वय 59) यांचा शनिवार दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी बारामती माळेगांव रस्त्यावर शारदानगर (माळेगांव) येथे नातीला सोडण्यासाठी जात असताना अपघात होवून अपघाती निधन झाले.
    राजेंद्र भागवत यांचा जन्म गोखळी ता. फलटण येथील शेतकरी दिनकर भागवत शेतकरी कुटुंबात झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण घेत कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी सतत धडपड केली.
    जयभवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी ता. फलटण या शैक्षणिक संस्थेत रुजू झाल्यानंतर गिरवी, फलटण हिंगणगांव जावली यासह अनेक गावात प्रामाणिकपणे नोकरी केली. फलटण तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम यांचे राजेंद्र भागवत हे कट्टर समर्थक होते.
    राजेंद्र भागवत यांच्यावर लहानपणापासूनच फुले शाहू आंबेडकर विचारांचा पगडा राहिल्याने त्यांचे विचार शेवटपर्यंत जपले. अनेक चळवळीत त्यांचा सहभाग होता.
    राजेंद्र दिनकर भागवत नोकरी करीत असतानाच त्यांना पत्रकारितेची आवड निर्माण झाली. त्यांनी दैनिक शिवसंदेश वर्तमानपत्रात काही काळ पत्रकार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नी सौ. शोभा राजेंद्र भागवत यांच्या नावे सन 1992 साली साप्ताहिक सुरु केले. शेती, पत्रकारीता व नोकरी या क्षेत्रात राजेंद्र भागवत यांनी स्वतःला झोकून देवून काम केले. दैनिक पुढारीचे माजी संपादक स्वर्गीय विलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक पुढारी या वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करीत, ग्रामीण पत्रकारितेची सुरुवात केली. फलटण तालुक्यातील जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक ऐक्य सातारा या वर्तमानपत्रात सन 1995 आजअखेर पत्रकार म्हणून राजेंद्र भागवत कार्यरत होते. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना राजेंद्र भागवत यांनी आपला वेगळा ठसा पत्रकारिता क्षेत्रात उमटवला होता. जनतेच्या प्रश्नांना वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडून ते सोडविण्यासाठी ते सतत प्रयत्नील होते.
    निधनामुळ शनिवार दि. 30 ऑगस्ट 2025 रोजी पत्रकार राजेंद्र भागवत हे आपली नात हिला शारदानगर (माळेगांव) येथे शाळेत सोडण्यासाठी जात असताना बारामती माळेगांव रस्त्यावर त्यांचा अपघात होवून अपघातात जागीच निधन झाले. राजेंद्र भागवत यांच्या अपघाती निधनामुळे गोखळी गावावर शोककळा पसरली आहे.
    पत्रकार राजेंद्र भागवत यांच्या पश्चात पत्नी, 3 विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार परिवार आहे. राजेंद्र भागवत यांची 2 मुले पोलीस खात्यात कार्यरत असून 1 मुलगा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) फलटण आगार येथे वाहक पदावर कार्यरत आहे.
    राजेंद्र भागवत यांच्या पार्थिवावर गोखळी ता. फलटण येथील स्मशानभूमीत दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

No comments