एक सृजनशील संपादक ते प्रेरक वक्ता : सचिन मोरे
फलटण तालुक्यातील वृत्तपत्र क्षेत्रात अनेक दिग्गज पत्रकारांनी आपल्याला लेखणीने, विचाराने समृद्ध परंपरा निर्माण करुन दिली आहे. अगदी त्याच परंपरेत अजून एक नावं आदराने घ्यावे लागते ते प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे राज्य समन्वयक, तालुक्यातील वरिष्ठ युवा पत्रकार सचिन संपतराव मोरे यांचे. आज 30 ऑगस्ट त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आढावा घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
"तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे. हे सर्वात खतरनाक शस्र आहे म्हणून तलवार हातात न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करा हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश आपल्या जीवनात उतरवणारे सचिन मोरे यांची, एक सृजनशील संपादक ते प्रेरक वक्ता ही खास ओळख. गेल्या 22 वर्षात वृतपत्र क्षेत्रात काम करीत असताना सचिन मोरे यांनी समाजाच्या व्यथा, वेदना या आपल्या लेखणीतून केवळ मांडल्याच नाहीत तर त्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. वृतपत्र क्षेत्रात साप्ताहिकच्या माध्यमातून सुरुवात केलेचे सांगून तालुक्यातील छोटया मोठया घटकांना व्यासपीठ मिळवून देणेचे काम केलेचे सचिन मोरे सांगतात. तर तालुक्यातील शंभरहून अधिक गावात वृतपत्राच्या माध्यमातून त्या गावातील सामाजिक, व्यावसायिक, वा विकासात्मक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम मोरे यांनी केलेचे अनेक जण कबूल करतात. आपल्या विशिष्ट शैलीदार लेखणीतून अनेकांवर प्रसंगी प्रहार करणारे सचिन मोरे यांनी त्याच लेखणीच्या माध्यमातून चांगल्या कामाचे कौतुकही केलेचे आपण पाहिले आहे.
संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात "मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे। भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।" याच प्रमाणे सचिन मोरे यांनी आपल्या धारधार लेखणीने अनेकांना वठणीवरही आणले आहे.
प्रेरक वक्ता ते यशस्वी प्रशिक्षक
वक्तृत्व हे सचिन मोरे यांचे आणखी एक वैशिष्ट्य. त्यांच्या वक्तृत्व शैलीने अनेक भाषणे त्यांनी गाजवली आहेत. विक्री व विपणन क्षेत्रात ते एक यशस्वी व सुप्रसिद्ध प्रशिक्षक आहेत. धैर्य फौंडेशन च्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा, छत्तीसगड, दिल्ली या ठिकाणी यशस्वी परिसंवाद घेतले आहेत. आजपर्यंत हजारो व्यवसायिकांना सचिन मोरे यांनी व्यावसायिक कला गुणांचे प्रशिक्षण दिले आहे. तर संभाषण कौशल्याच्या माध्यमातून अनेक वक्ते घडविले आहेत. फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणुकीपूर्वी " एक निर्धार बौद्ध आमदार " या संकल्पनेतून समाजाच्या जागृती मोहिमेच्या वेळी सचिन मोरे यांनी भाषणे समाज माध्यमांवर विशेष गाजली होती.
समाजाप्रती विशेष जागृत
बाबासाहेब सांगतात, लोकांना आपल्या हक्कासाठी सतत संघर्ष करावा लागतो आणि त्यासाठी त्यांनी नेहमी तत्पर राहावे. अशा हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या समाजातील लोकांच्या पाठीशी राहून त्यांना प्रेरणा व बळ देण्याचे काम सचिन मोरे आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष करीत आहेत.
अभ्यास व चिंतनातून अनेक प्रश्नांवर उत्तर शोधण्याचे वेगळे कसब सचिन मोरे यांच्याकडे असल्याचे त्यांच्या जीवनाकडे पाहिले की जाणवते. शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता प्रत्येकाच्या अंगी असते फक्त आपण अपल्या क्षमता ओळखल्या पाहिजेत हा संदेश सचिन मोरे आजच्या तरुणांना देतात. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
No comments