Breaking News

ढोल-ताशांच्या गजरात आयडियलच्या दोन्ही शाखांमध्ये बाप्पाचे आगमन

Bappa arrives at both branches of Ideal amidst the sound of drums and cymbals

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ ऑगस्ट २०२५ - आयडियल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या लक्ष्मीनगर व बिरदेवनगर या दोन्ही शाखांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन अतिशय उत्साहात, भक्तिमय आणि मंगल वातावरणात संपन्न झाले. सकाळपासूनच शाळेच्या परिसरात आनंद, उत्साह आणि अध्यात्मिकतेचे वातावरण अनुभवायला मिळाले. संपूर्ण हॉल आकर्षक सजावट, सुंदर डेकोरेशनने सजवला होता. तसेच सर्व परिसरात रंगीत रांगोळी काढून सुशोभित करण्यात आला होता, ज्यामुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला.

    विद्यार्थ्यांनी ढोल, ताशा व लेझीमच्या गजरात गणपती बाप्पाचे वाजतगाजत स्वागत केले. गणेश आगमनानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे मॅडम यांनी गणपती बाप्पाचे औक्षण केले. त्यानंतर ब्राह्मण काकांच्या मंत्रोच्चारात विधिवत पूजन संपन्न झाले. शाळेचे सेक्रेटरी निखिल सर यांच्या हस्ते मुख्य पूजन करण्यात आले. पूजनानंतर महाआरतीचा गजर संपूर्ण वातावरण भारावून टाकणारा होता. गणपती गाणी, भजने आणि ढोल ताशांचा निनाद यामुळे वातावरण अधिकच प्रसन्न व मंगलमय झाले.

    या सोहळ्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे मॅडम, शाळेचे डायरेक्टर शिवराज भोईटे सर, सेंटर हेड सुचिता जाधव मॅडम, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना गुळ-उकडीच्या मोदकांचा प्रसाद वाटप करण्यात आला.

    या उत्सवातून विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील परंपरांचे महत्त्व, सामूहिक कार्याची जाणीव, सण साजरा करण्यातील एकात्मतेची प्रेरणा आणि भक्तीचा अनुभव घेतला. या प्रसंगातून त्यांच्या मनामध्ये अध्यात्मिकतेची ओढ व भारतीय परंपरेचा अभिमान जागृत झाला.

    शाळेच्या दोन्ही शाखांमध्ये झालेला हा सोहळा अविस्मरणीय ठरला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन, सर्व शिक्षकांचा सहभाग व विद्यार्थ्यांचा उत्साह या मागे शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे मॅडम यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन व परिश्रम अधोरेखित झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली आयडियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रत्येक उत्सव हा केवळ साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचा व संस्कारांचा अनमोल धडा ठरतो.

No comments