श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतली ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ जुलै २०२५ - अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे फलटण तालुका अध्यक्ष, गुणवरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश तुकाराम आढाव यांचे दि. १८ जुलै रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी व जावई असा परिवार आहे.
प्रा. आढाव यांच्या निधनानंतर विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या परिवाराची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. त्यांनी कै. रमेश आढाव यांच्या पत्नी, मुलगा ऋषिकेश आढाव, सून, मुलगी व जावयाचे मनपूर्वक सांत्वन करत, दु:खाच्या या काळात कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
या भेटीत त्यांनी भावनिक शब्दांत कुटुंबीयांना धीर दिला व "भविष्यात कोणतीही मदत लागल्यास मी नेहमीच तुमच्यासोबत आहे, निःसंकोचपणे संपर्क करा," असे आश्वासन दिले. श्रीमंत रामराजे यांच्या या भेटीमुळे आढाव कुटुंबियांच्या दुःखावर थोडा का होईना आधार मिळाला. पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांनी प्रा. रमेश आढाव यांचेही स्मरण केले.
No comments