पतंग उडविण्यासाठी चायना मांजा वापरल्यास होणार कारवाई
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ जुलै २०२५ - दरवर्षी प्रमाणे सध्या हौशी मुले, तरुणांकडुन पतंग उडविले जात आहेत. दि.२९/०७/२०२५ रोजी नागपंचमी साजरी होणार आहे. त्या निमीत्ताने पतंग उडविण्याचे प्रमाणही वाढणार आहे. परंतु यावेळी हौशी व्यक्तींकडुन पतंग उडविताना सिथेटिक / नॉयलॉन / चायना मांजाचा वापर केल्याने, तो तुटून सामान्य नागरीकांना जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या अनुषंगाने सन २०२४ मध्ये नॉयलॉन मांजा बाळगल्याच्या कारणावरुन फलटण शहर पोलीस ठाणे येथे खालील प्रमाणे २ गुन्हे दाखल झाले होते.
(१) दि.०९/०८/२०२४ रोजी उंब्रेश्वर चौक, फलटण येथे रेवणसिध्द अतुल यादव, वय २० वर्षे, रा. वाजेगाव, ता. फलटण आणि तेजस राहुल कांबळे, वय १९ वर्षे, रा. उंब्रेश्वर चौक, फलटण यांचे ताब्यातून नॉयलॉन मांजा मिळुन आल्याने, त्यांच्या विरुध्द फलटण शहर पोलीस ठाणे येथे गु.नॉ.क्र.३९९/२०२४, कलम २२३, ३(५) भारतीय न्याय संहिता, २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
(२) दि.०९/०८/२०२४ रोजी मेटकरी गल्ली, फलटण येथे शाहरुख दस्तगीर काझी, वय २७ वर्षे, रा.मेटकरी गल्ली, फलटण यांचे ताब्यातुन नॉयलॉन मांजा मिळून आल्याने, त्यांच्या विरुध्द फलटण शहर पोलीस ठाणे येथे गु.नॉ.क्र.३९६/२०२४, कलम २२३, १२५ भारतीय न्याय संहिता, २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दि.०९/०८/२०२४ रोजी पतंग उडविताना तुटलेल्या नॉयलॉन मांजा मुळे रानडे पेट्रोल पंपासमोर, लोणंद रोड येथे श्री दिपक अर्जुन लांडगे, वय ३५ वर्षे, रा. सोनगाव, ता. फलटण यांच्या गळ्यास व इतर शरीरीक भागास जखम झाली होती. सदरबाबत फलटण शहर पोलीस ठाणे येथे गु.नॉ.क्र.४००/२०२४, कलम १२५ (अ) भारतीय न्याय संहिता प्रमाणे अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल झाला होता. या व्यतिरिक्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, फलटण येथे एका व्यक्तीस जखम झाली होती.
या अनुषंगाने फलटण शहर पोलीस ठाण्याकडुन नॉयलॉन / चायना मांजा विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत फलटण शहरातील पतंगाचा दोरा विक्री करणा-या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे.
तसेच पंतग उडविणारी मुले, पुरुषांच्या पतंग उडविण्याच्या ठिकाणी पोलीस भेट देत असून, पतंगाच्या दोराची तपासणी करीत आहेत.
या मोहीमेदरम्यान आज दि. १८/०७/२०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता सोमवार पेठ, मंगळवार पेठ परिसरात अल्पवयीन मुले पतंग उडविताना दिसुन आली. पोलीसांना पाहताच ती मुले पळून गेली. ते टाकून गेलेल्या पतंगाचा दोरा पाहता, तो नॉयलॉन दोराचे चार रीळ असल्याचे दिसून आले आहे. सदरचे रीळ जप्त केले असुन, या अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यात येत आहे.
या अनुषंगाने सर्व फलटण वासीयांना आवाहन करण्यात येते की, वर नमुद नॉयलॉन / चायना मांजा अशा सिथेटिक / कृत्रिम धाग्याचा वापराचा प्रतिकूल परिणाम सर्वसाधारण सुरक्षेवर आणि जैवविविधेवर होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी आणि अशा धाग्या ऐवजी पर्यायी पर्यावरणपुरक धाग्यांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अधिसुिचना निर्गमित केलेली आहे. या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालीका, महसुल विभाग, जिल्हा परिषद, प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य सेवा, पोलीस दल तसेच वन विभागास अधिकार प्रदान केले आहेत.
पतंग उडविताना नॉयलॉन / चायना मांजा अशा सिथेटिक / कृत्रिम धाग्याचा वापर करणे हे गुन्हेगारी कृत्य आहे. सिंथेटिक / नॉयलॉन / चायना मांजाचा वापर केल्यास, भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत तरतुदींन्वये गुन्हा दाखल करुन पुढील कडक कारवाई करण्यात येईल. मुलांकडुन तसेच तरुणांकडुन असे गुन्ह्यांचे कृत्य झाल्यास, गुन्हा दाखल झाल्याने, त्यांच्या उज्वल भविष्यावर परिणाम होतो. या मांजा मुळे सर्वसामान्य लोकांना तसेच पशुपक्षांना साध्या व गंभीर स्वरुपाच्या जखमा होत असतात. त्यामुळे सर्व पतंग उडविणा-या सर्व मुलांनी व तरुणांनी पतंग उडविताना, सिंथेटिक / नॉयलॉन / चायना मांजाचा वापर करु नये. पालकांनी, विविध अपार्टमेंट मध्ये राहणा-या रहीवाश्यांनी, सजग नागरिकांनी असा नॉयलॉन किंवा चावना मांजाचा वापर करताना कोणी दिसुन आल्यास, ११२ या टोल फ्री क्रमांकावर किंवा फलटण शहर पोलीस ठाणे येथे दुरध्वनी क्र.०२१६६ २२२३३३ वर संपर्क करावा.
No comments