Breaking News

मण्यार सापाने गवत्या सापाची केली शिकार

A grass snake was hunted by a manyar snake

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ जुलै २०२५ - रात्रीच्या शांत वेळेत गोळेवाडी (ता. फलटण) येथील एका घराजवळ असलेल्या पायऱ्यांवर स्थानिकांनी थरकाप उडवणारे दृश्य पाहिले. एका सापाने दुसऱ्या सापाची शिकार करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेमुळे घाबरलेल्या नागरिकांनी तात्काळ नेचर अ‍ॅण्ड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी (NWWS), फलटण या संस्थेशी संपर्क साधला.

    घटनेची माहिती मिळताच संस्थेच्या रेस्क्यू पथकातील रवींद्र लिपारे व जयेश शेट्ये काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान स्पष्ट झाले की हा साप म्हणजे भारतातील एक अतिविषारी प्रजातीतील मण्यार (Common Indian Krait) असून तो एका बिनविषारी गवत्या सापाची (Green Keelback) शिकार करत होता.

    संस्थेच्या पथकाने अन्नसाखळीतील नैसर्गिक व्यवहारात कोणतीही अडथळा न आणता मण्यार सापाला शिकार पूर्णपणे खाऊ दिली. त्यानंतर दक्षतेने व सुरक्षितरीत्या त्याला पकडले आणि स्थानिकांच्या गर्दीतून दूर नेत त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

    या वेळी उपस्थित नागरिकांना माहिती देताना NWWS फलटणच्या सदस्यांनी स्पष्ट केले की मण्यार हा साप अतिविषारी असला तरी स्वभावाने शांत असतो. तो सहसा माणसांवर हल्ला करत नाही. मण्यार मुख्यतः इतर साप खाणारा असल्याने अन्नसाखळी संतुलित ठेवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका आहे.

    नागरिकांना संस्थेचे आवाहन: साप दिसल्यास घाबरू नये, मारू नये. त्याऐवजी तात्काळ NWWS संस्था किंवा स्थानिक वनविभागाशी संपर्क साधावा.

No comments